Khelo India : महाराष्ट्र महिला कबड्डी संघाने गाठली फायनल; पहिल्यांदा चॅम्पियन होण्याची संधी
Khelo India Youth games : उपांत्य सामन्यात हिमाचल प्रदेशवर महाराष्ट्राचा विजय, महाराष्ट्र-हरियाणा फायनल रंगणार
Khelo India Youth games : फार्मात असलेल्या रेडर हरजित, यशिका पुजारी, मनीषा आणि समृद्धी यांनी अप्रतिम खेळीतून महाराष्ट्र महिला कबड्डी संघाला खेलो इंडिया यूथ गेम्सच्या फायनल चे तिकीट मिळवून दिले. युवा कर्णधार निकिताच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्र महिला संघाने अंतिम फेरीचा पल्ला गाठला. महाराष्ट्र महिला संघाने बुधवारी उपांत्य लढतीत हिमाचल प्रदेशवर 12 गुणांनी विजयाची नोंद केली. महाराष्ट्र संघाने 44-31 अशा फरकाने सेमी फायनल मध्ये एकतर्फी विजय संपादन केला.
या लक्षवेधी कामगिरीच्या बळावर महाराष्ट्र संघाला पहिल्यांदाच फायनल मध्ये प्रवेश निश्चित करता आला. मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांचे मार्गदर्शन आणि निकिताचे कुशल नेतृत्व यातून महाराष्ट्र संघ आता चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी महाराष्ट्राला अंतिम सामन्यात हरियाणा विरुद्ध विजय संपादन करावा लागणार आहे. गुरुवारी हरियाणा आणि महाराष्ट्र यांच्यात फायनल रंगणार आहे.
राष्ट्रीय खेळाडू हरजीत, यशिका आणि मनीषा यांनी आपल्या दर्जेदार कामगिरीत सातत्य ठेवत महाराष्ट्र संघाला मोठा विजय मिळवून दिला. आक्रमक खेळीतून महाराष्ट्र संघाने पहिल्या हाफ मध्येच आघाडी घेत विजयाचे संकेत दिले. यादरम्यान निकिता, समृद्धी आणि हरजीत यांनी अचूक पकडीतून हिमाचल प्रदेशचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडला.
हरियाणाला नमवून चॅम्पियन होणार महाराष्ट्र
महाराष्ट्र महिला संघाला आता किताब जिंकण्याची मोठी संधी आहे. याच सोनेरी यशापासून महाराष्ट्राचा संघ अवघ्या एका पावलावर आहे. आता महाराष्ट्र संघ फायनल मध्ये हरियाणाला नमवून चॅम्पियन होण्यासाठी सज्ज झाला आहे. गुरुवारी महिला गटाच्या फायनल मध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा संघ समोरासमोर असतील.
संघाला सोनेरी यश मिळवून देणार: निकिता
महाराष्ट्र संघातील प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करत संघाची किताब जिंकण्याची आशा कायम ठेवली आहे. या दरम्यान रेडर हरजित, यशिका, मनीषा यांची कामगिरी लक्षवेधी ठरली. त्यामुळे आम्हाला पहिल्यांदा फायनल गाठण्याचा पराक्रम गाजवता आला. आता महाराष्ट्र संघाला ऐतिहासिक सुवर्णपदक मिळवून देण्यासाठी उत्सुक आहे, अशा शब्दात कर्णधार निकिताने आपला निर्धार व्यक्त केला.
डावपेच फत्ते करत गाठली फायनल: गीता साखरे (प्रशिक्षक)
पहिल्यांदाच चॅम्पियन होण्यासाठी उत्सुक असलेल्या महाराष्ट्र संघाने आखून दिलेले सर्व डावपेच फत्ते केले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला अंतिम फेरीचा पल्ला गाठता आला. उपांत्य सामन्यातील धडाकेबाज विजयाने महाराष्ट्र महिला खेळाडूंचा आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे संघ आता निश्चितपणे किताबाचा बहुमान मिळावेल, असा विश्वास मुख्य प्रशिक्षक गीता साखरे यांनी व्यक्त केला.