(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Khelo India : जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राचे निर्विवाद वर्चस्व, संयुक्ता काळेचा सुवर्ण चौकार
Khelo India : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला.
Khelo India Youth games : गतसत्रातील पाच सुवर्णपदक विजेत्या आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्ता काळेने रविवारी मध्य प्रदेश येथे आयोजित खेलो इंडिया युथ गेम्स मध्ये गोल्डन चौकार मारला. जिम्नॅस्टिक मध्ये आपले वर्चस्व कायम ठेवत तिने यंदा चार सुवर्णपदकांचा बहुमान पटकावला.रिदमिकमध्ये संयुक्ता हिने आज रिबन, हूप, क्लब व चेंडू प्रकारात सोनेरी यश संपादन केले. काल तिला एक रौप्य पदकही मिळाले होते. किमया कार्ले हिने तीन कांस्य पदकांची कमाई केली.
संयुक्ता हिने गत वेळी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली होती. महाराष्ट्राची सुवर्ण कन्या असलेल्या संयुक्ता काळे हिने नोंदवलेल्या सुवर्णपदकाच्या चौकारासह महाराष्ट्राने जिम्नॅस्टिक्समध्ये निर्विवाद वर्चस्व गाजविले. त्यांनी सात सुवर्ण, पाच रौप्य व सहा कांस्य अशी एकूण अठरा पदकांची कमाई केली. या स्पर्धेतील कलात्मक प्रकारात आर्यन दवंडे याने एक सुवर्ण एक रौप्य व दोन कांस्य पदके जिंकली तर सार्थक राऊळ व मान कोठारी यांनी प्रत्येकी एक रौप्य पदक जिंकले. मुलींमध्ये सारा राऊळ व उर्वी वाघ यांनी प्रत्येकी एक सुवर्ण तर रिया केळकर हिने एक रौप्य पदक पटकाविले. शताक्षी कुमारी हिला एक कास्यपदक मिळाले.
संयुक्तामुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा: आयुक्त दिवसे
आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्त काळे मुळे राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सोनेरी यशाची कामगिरी कायम ठेवत तिने महाराष्ट्राला चार सुवर्णपदके मिळवून दिले. निश्चितपणे ही खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे नावलौकिकास साजेशी चमकदार कामगिरी करत आहे. त्यामुळे ती निश्चितपणे आगामी काळात ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राकडून खेळताना दिसणार आहे असा विश्वास क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी व्यक्त केला.
ऑलिंपिक स्पर्धेत सहभागी होण्याची दावेदार: कोच सुर्वे
आंतरराष्ट्रीय खेळाडू संयुक्तामध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. त्यामुळेच सध्या ती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सोनेरी यशाचा पल्ला गाठत आहे. आगामी काळात निश्चितपणे ती ऑलम्पिक स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करताना दिसणार आहे. ऑलम्पिक चे तिकीट मिळवण्याची प्रचंड क्षमता तिच्यामध्ये आहे. त्यामुळे तिला या जागतिक दर्जाच्या स्पर्धेसाठी दावेदार मानले जात आहे अशा शब्दात मुख्य प्रशिक्षक पूजा सुर्वे आणि मानसी सुर्वे यांनी चॅम्पियन संयुक्तावर कौतुकाचा वर्षाव केला.
महाराष्ट्राला मिळवून दिली आघाडी: पथकप्रमुख चंद्रकांत कांबळे
जिम्नॅस्टिक मध्ये नेत्र दीपक कामगिरी करत युवा खेळाडू संयुक्ताने चार सुवर्णपदके जिंकले. त्यामुळे महाराष्ट्र संघाला पुन्हा एकदा पदक तालिकेमध्ये मोठी आघाडी घेता आली आहे. याच सोनेरी यशामुळे महाराष्ट्र संघाने पुन्हा पदक तालिकेत अव्वल स्थान गाठले. या युवा खेळाडूची या स्पर्धेतील ही कामगिरी लक्षवेधी ठरलेली आहे, अशा शब्दात सह-संचालक चंद्रकांत कांबळे यांनी पदक विजेत्या संयुक्ताचे कौतुक केले.