Khelo India Youth Games 2022 : अॅथलेटिक्स, जलतरणात पाच सुवर्णपदके; खो-खो, टेनिसमध्ये महाराष्ट्राची आगेकूच
Khelo India Youth Games 2022 : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सीलसिला सुरूच राहिला. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले.
Khelo India Youth Games 2022 : खेलो इंडिया स्पर्धेत महाराष्ट्राचा आजही पदकांचा सीलसिला सुरूच राहिला. अॅथलेटिक्समध्ये तीन सुवर्ण, एक रौप्य पदक मिळाले. जलतरणात दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदके आली. खो-खोमध्ये मुला-मुलींच्या संघांनी विजयी सलामी देत आगेकूच केली. टेबल टेनिसमध्ये सायली राजेश वाणी व प्रिथा प्रिया वर्तीकर यांनी विजय मिळवले.
जलतरणमध्ये 400 मीटर फ्रीस्टाईल - आन्या वाला (मुंबई) हिने सुवर्ण, 100 मीटर बटरफ्लाय - अपेक्षा फर्नांडीस हिनेही सुवर्ण पदक जिंकले. 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पुण्याच्या उत्कर्ष गौर व 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये मुंबईच्या पलक जोशीने कांस्य पदकावर नाव कोरले. महाराष्ट्राच्या पदकतालिकेत आज एकंदर पाच सुवर्ण, एक रौप्य व दोन कांस्य पदकांची भर पडली. वेटलिफ्टिंगमध्ये मुलांच्या संघाला सर्वसाधारण उपविजेतेपद मिळाले. मुलींच्या ४ बाय 400 रिलेच्या संघाने विजेतेपदक उंचावले.
200 मीटर धावण्यात सातारच्या सुदेष्णा शिवणकरने आजही सुवर्ण कामगिरी केली. अवंतिका नरळे हिला याच प्रकारात रौप्यपदक मिळाले. मुलांमध्ये आर्यन कदम (पुणे) याने 200 मीटरमध्ये सुवर्ण पदक उंचावले. मुलींच्या रिलेच्या विजेत्या संघात रिया पाटील (कोल्हापूर), वैष्णवी कातुरे (नाशिक), प्रांजली पाटील (मुंबई), शिवेच्छा पाटील (पुणे) यांचा समावेश होता. त्यांच्या संघाने सुवर्ण जिंकले. उद्या मल्लखांबमध्ये सांघिक आणि वैयक्तिक पदके मिळण्याची आशा आहे.
दुखापतीतून पदकाकडे
मुलींच्या 100 मीटर रिले संघात सहभागी झालेली औरंगाबादची साक्षी चव्हाण काही महिन्यांपूर्वी दुखापतग्रस्त होती. तिच्या गुडघ्याला मोठी दुखापत होती. त्यातून ती नुकतीच सावरली आहे. गेल्या वर्षी तिला स्पर्धा खेळता आली नव्हती. खेलो इंडियात सहभागी होण्यापूर्वी ती गुजरातमध्ये स्पर्धा खेळली. मात्र, त्या स्पर्धेत तिला सहाव्या स्थानावर समाधान मानावे लागले. खेलो इंडियात ती रिलेच्या संघात दुसऱ्या लेगला धावली. महाराष्ट्राने घेतलेली आघाडीने तिने कायम ठेवली. दुखापतीतून सावरून पदक उंचावल्याचा आनंद खूप मोठा असल्याची भावना साक्षीने व्यक्त केली.
पदकतालिका
हरियाणा - 33 सुवर्ण, 27 रौप्य, 36 कांस्य (एकूण 96)
महाराष्ट्र - 30 सुवर्ण, 28 रौप्य, 25 कांस्य (एकूण 83)
मणिपूर - 13 सुवर्ण, 3 रौप्य, 2 कांस्य (एकूण 18)
(ही आकडेवारी सायंकाळी साते वाजेर्यंतची आहे)