खेलो इंडिया पॅरा गेम्स : ॲथलेटिक्समध्ये सचिन, तर नेमबाजीत स्वरूपला सुवर्ण
Khelo India : ॲथलेटिक्समध्ये महाराष्ट्राचे सहावे सुवर्ण, नेमबाजीत पहिले सुवर्ण, पदकतालिकेत महाराष्ट्र 24 पदकांसह चौथ्या स्थानी

नवी दिल्ली : पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेला नेमबाज स्वरुप उन्हाळकर आणि धावपटू सचिन खिल्लारी यांनी खेलो इंडिया पॅरा क्रीडा स्पर्धेत बुधवारी भारताला सुवर्णपदके मिळवून दिली. पहिले तीन दिवस पदकांचा सपाटा लावलेल्या महाराष्ट्राच्या खेळाडूंना आज मर्यादित यशावर समाधान मानावे लागले.
ॲथलेटिक्समध्ये एफ ४६ प्रकारात मुंबईच्या सचिन खिल्लारीने १५.६३ मीटर गोळा फेक करताना सुवर्ण कामगिरी केली. गीता चव्हाण, दिलीप गावित, भाग्यश्री जाधव यांच्याप्रमाणेच सचिनने यश मिळवताना महाराष्ट्राचा ॲथलेटिक्समध्ये दबदबा राखला. या स्पर्धा प्रकारात महाराष्ट्राला सहा सुवर्ण आणि सहा ब्राँझपदकेही मिळाली आहेत. महाराष्ट्राच्या खेळाडूंनी कमालीच्या जिद्दीने खेळ करताना आपले कौशल्य पणाला लावले. त्यांच्या प्रयत्नांना पदकाची पावती मिळाली. या खेळाडूंमुळे महाराष्ट्राला वर्चस्व राखता आले अशा शब्दात प्रशिक्षक सुरेख काकड यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
नेमबाजीत पॅरिस ऑलिम्पिकच्या वाटेवर असलेल्या स्वरुप उन्हाळकरने आपला लौकिक कायम राखला. पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल स्टॅंडिंग एसएच १ प्रकारात २४३.५ गुणांची कमाई करत सुवर्ण वेध साधला. या स्पर्धा प्रकारात किरण केंगलकर पाचव्या स्थानावर राहिला. स्वरुप ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध करण्याच्या तयारीत असून, अलिकडेच त्याची गुणवत्ता बघून रायफल उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या वॉल्थर कंपनीने त्याला अधुनिक बनावटीची नवी रायफल भेट म्हणून दिली होती. या रायफलशी जुळवून घेण्यास वेळ लागेल. पण, ही भेट माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल आणि ऑलिम्पिकमध्ये यश मिळविण्यासाठी कौशल्य पणाला लावेन, असा विश्वास स्वरुपने व्यक्त केला.
महाराष्ट्राला आता शुक्रवारी सुरु होणाऱ्या तिरंदाजी स्पर्धा प्रकारातून चांगले यश मिळण्याची अपेक्षा आहे. आतापर्यंत महाराष्ट्र ७ सुवर्ण, ६ रौप्य आणि ११ ब्राँझ असा २४ पदकांसह चौथ्या स्थानावर आहे. हरियाना (२५, ३१, १३) ६९ पदकांसह अव्वल स्थानावर असून, उत्तर प्रदेश (२०, १६, ८) ४४, तमिळनाडू (१४, ४, १०) २८ पदकांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.
नेत्रदिपक कामगिरी - सुहास दिवसे
आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा अनुभव पणाला लावताना खेळाडूंनी पहिल्या पॅरा खेलो इंडिया स्पर्धेत केलेली कामगिरी विलक्षण असून, त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. खेळाडूंच्या कामगिरीने महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. अन्य खेलो इंडिया स्पर्धेतील महाराष्ट्राचे यश या पॅरा खेळाडूंच्या यशाने द्विगुणित झाले, अशा शब्दात क्रीडा आयुक्त सुहास दिवसे यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
