अंगठ्याच्या दुखापतीमुळे बुमराह दुसरी टेस्टही खेळू शकणार नाही
दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जलद गोलंदाज जसप्रीस बुमराह दुसरा सामन्यातही खेळू शकणार नाही.
लंडन : पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर टीम इंडिया लॉर्डवरील दुसऱ्या सामन्यात धमाकेदार वापसी करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात विजयाच्या जवळ पोहचूनही भारताला निराशजनक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.
मात्र लॉर्ड येथे 9 ऑगस्टपासून खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. भारतीय संघातील महत्त्वाचा जलद गोलंदाज जसप्रीस बुमराह अंगठ्याच्या दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही.
बुमराह अंगठ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. त्यामुळे लॉर्डवरील दुसऱ्या कसोटी सामन्यातही तो खेळणार नाही. बुमराह टीम इंडियाचा प्रमुख जलद गोलंदाज असल्याने अंगठ्याची दुखापत असूनही त्याला इंग्लंडविरुद्ध पहिल्या तीन कसोटी सामन्यांसाठी संघात समाविष्ट करुन घेण्यात आलं होतं.
त्यामुळे पहिल्या सामन्याला मुकलेला बुमराह दुसऱ्य़ा सामन्यात खेळू शकेल, असं वाटत होतं. मात्र बुमराह दुसऱ्य़ा सामन्यातही खेळणार नसल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. बुमराह सातत्यानं नेट प्रॅक्टीस करताना दिसत आहे. सामन्यासाठी तयार होण्याचा तो प्रयत्न करत आहे. मात्र सामन्यात खेळण्यासाठी तो पूर्णपणे फिट नसून त्यासाठी त्याला अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे.
"बुमराहला कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात घेण्यात आलं आहे. मात्र तो दुसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार की नाही, हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून असेल", हे बीसीसीआयने आधीच स्पष्ट केलं होतं.
आयर्लंडविरुद्धच्या टी-20 सामन्यात बुमराहच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. त्यामुळे बुमराह लवकरच फिट होऊन भारतीय संघात वापसी करेल अशी आशा सर्वांकडून व्यक्त केली जात आहे.