टी20 वर्ल्डकपमध्ये तीन खेळाडू भारतासाठी गेमचेंजर ठरतील, सिक्सर किंगला विश्वास, विराट-रोहितवरही भाष्य
World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 चा महासंग्राम एक जूनपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे.
Yuvraj Singh T20 World Cup 2024 : टी20 वर्ल्ड कप 2024 चा महासंग्राम एक जूनपासून सुरु होणार आहे. भारताचा पहिला सामना पाच जून रोजी आयर्लंडविरोधात होणार आहे. स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच विश्वविजेत्या युवराजला आयसीसीनं यंदाच्या टी20 वर्ल्डकपचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्त केले आहे. युवराज सिंह यानं आयसीसीसोबत बोलताना भारतीय संघासाठी विश्वचषकात गेमचेंजर ठरणाऱ्या तीन खेळाडूंची नावं सांगितली आहे. युवराज सिंहच्या मते सूर्यकुमार यादव भारतासाठी एक्स फॅक्टर ठरणार आहे. त्याशिवाय जसप्रीत बुमराह आणि युजवेंद्र चहलही गेमचेंजर ठरतील.
सूर्यकुमार यादव सध्या भन्नाट फॉर्मात आहे. टी 20 सामन्यात सूर्यानं अनेकदा आपला करिष्मा दाखवलाय. यंदाही सूर्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जातोय. आयसीसीला दिलेल्या मुलाखतीत युवराज म्हणाला की, "सूर्यकुमार यादव विश्वचषकात टीम इंडियाचा की प्लेअर असेल. कारण सूर्या ज्या पद्धतीनं खेळतोय तो फक्त 15 चेंडूमध्ये सामन्याचं चित्र बदलू शकतो. सूर्यकुमार यादवमुळे टीम इंडिया विश्वचषक जिंकू शकतो."
युवराज सिंह यानं जसप्रीत बुमराह याची भूमिकाही टीम इंडियासाठी महत्वाची ठरेल, असं म्हटलेय. गोलंदाजीमध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा की प्लेअर असे. तसेच भारताच्या संघात लेग स्पिनर महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्यासाठी युजवेंद्र चहल याची निवड करण्यात यावी. युजवेंद्र चहल भन्नाट फॉर्मात आहे, असेही युवी म्हणाला.
Who will make it to India’s squad for the ICC Men’s #T20WorldCup 2024? 🤔
— ICC (@ICC) April 26, 2024
Event Ambassador Yuvraj Singh has some exciting prospects on his list 👀https://t.co/zMjeIig7qF
कार्तिक नकोच -
टी 20 विश्वचषकासाठी पुन्हा एकदा दिनेश कार्तिकच्या नावाची चर्चा सुरु झाली. पण युवराजच्या मते दिनेश कार्तिकला संघात स्थान मिळणार नाही. कारण, त्याला प्लेईंग 11 मध्ये घेणारच नसेल तर निवडण्यात अर्थ नाही. त्याऐवजी ऋषभ पंत आणि संजू सॅमसन हे दोन पर्याय असतील. 2022 वर्ल्डकपमध्ये कार्तिकला स्थान दिले, पण तो प्रभावी कामगिरी करु शकला नाही. त्याशिवाय दिनेश कार्तिकचं वय हा मोठा फॅक्टर आहे, असेही युवराज म्हणाला.
विराट-रोहितनं निवृत्ती घ्यावी -
विराट कोहली आणि रोहित शर्मा यंदाच्या विश्वचषकात शानदार कामगिरी करतील, यात दुमत नाही. पण विश्वचषकानंतर दोघांनीही टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी. पुढील विश्वचषकात युवा खेळाडूंना संधी मिळायला हवी, असं मला वाटतेय. विराट आणि रोहित यांना कुठं थांबायचं हे माहितेय, असेही युवी म्हणाला.