48 तासांत आरसीबीने पंजाबच्या घरात घुसून घेतला बदला; कोहलीसमोर अय्यरच्या संघाने टेकले हात, पॉइंट टेबलमध्ये मोठा बदल
आयपीएल 2025 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला गेला.

Punjab Kings vs Royal Challengers Bengaluru IPL 2025 : आयपीएल 2025 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला गेला. दोन्ही संघांमधील ही लढत मुल्लानपूर येथील महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाली, जिथे आरसीबी संघाने सहज विजय मिळवला. यासह, आरसीबीने पंजाब संघाकडूनही बदला घेतला. खरंतर, या हंगामात या दोन्ही संघांमधील ही दुसरी लढत होती. याआधी 18 एप्रिल रोजी पंजाबने आरसीबीला त्यांच्याच घरच्या मैदानावर 95 धावांवर गुंडाळले होते आणि 5 विकेट्सने विजय मिळवला होता. पण या सामन्यात आरसीबीकडून दमदार कामगिरी दिसून आली.
Jitesh Sharma dials 6⃣ to seal it in style 🙌
— IndianPremierLeague (@IPL) April 20, 2025
Virat Kohli remains unbeaten on 73*(54) in yet another chase 👏@RCBTweets secure round 2⃣ of the battle of reds ❤
Scorecard ▶ https://t.co/6htVhCbltp#TATAIPL | #PBKSvRCB pic.twitter.com/6dqDTEPoEA
आरसीबीच्या गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो योग्य ठरला. पंजाबच्या फलंदाजांना कमी धावसंख्येपर्यंत रोखण्यात आरसीबीच्या गोलंदाजांना यश आले. पंजाब संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून फक्त 157 धावा केल्या. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक 33 धावा केल्या. त्याच वेळी, शशांक सिंगने 31 धावांची नाबाद खेळी करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. जोश इंगलिसनेही 29 धावा केल्या आणि मार्को जॅन्सन 25 धावांवर नाबाद राहिला.
दुसरीकडे, कृणाल पांड्या आरसीबीचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने त्याच्या 4 षटकांच्या स्पेलमध्ये फक्त 25 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांची शिकार केली. सुयश शर्मानेही 4 षटकांत 26 धावा देत 2 विकेट घेतले. या व्यतिरिक्त, रोमारियो शेफर्डने 1 यश मिळवले. भुवनेश्वर कुमारनेही किफायतशीर गोलंदाजी केली, जरी त्याला एकही विकेट घेता आली नाही.
विराट-पडिक्कलने ठोकली अर्धशतकं
158 धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात खराब झाली. 1 धाव केल्यानंतर फिल सॉल्टने आपली विकेट गमावली. पण यानंतर विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्यात चांगली भागीदारी झाली. दोन्ही फलंदाज अर्धशतके करण्यात यशस्वी झाले. देवदत्त पडिक्कलने 174.28 च्या स्ट्राईक रेटने 35 चेंडूत 61 धावा केल्या, ज्यात 5 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. विराट कोहलीने 54 चेंडूत 7 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 73 धावा केल्या, ज्यामुळे आरसीबीला 7 गडी गमावून लक्ष्य गाठता आले. आरसीबीचा हा 8 सामन्यांमधील 5 वा विजय आहे. आता या हंगामात 5 संघांचे 10-10 गुण आहेत. त्याच वेळी, पंजाबला 8 सामन्यांतील तिसरा पराभव पत्करावा लागला आहे.





















