Rohit Sharma : देशाचं प्रतिनिधीत्व करतात त्यांना प्राधान्य मिळायला हवं, मुंबईनं रिटेन करताच रोहित शर्माकडून भावना व्यक्त, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सनं रिटेन केल्यानंतर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मुंबईतून क्रिकेट करिअर सुरु केल्याचं तो म्हणाला.
मुंबई: मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 साठी पाच खेळाडूंना रिटेन केलं आहे. यामध्ये टीमचा माजी कॅप्टन रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माचा समावेश आहे. मुंबई इंडियन्सनं रिटेन्शनमध्ये 75 कोटी रुपयांचा खर्च करत या खेळाडूंना रिटेन केलं. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार मुंबई इंडियन्सनं रिटेन करताच रोहित शर्मानं भावना व्यक्त केल्या आहेत. रोहित म्हणाला मी मुंबईत खूप क्रिकेट खेळलं आहे, या ठिकाणी मी माझं क्रिकेट करिअर सुरु केलं होतं.
रोहित शर्मा पुढे म्हणाला, मुंबई शहर माझ्यासाठी विशेष आहे. मुंबईसाठी मी दीर्घकाळ खेळलो आहे. त्यामुळं अनेक अविस्मरणीय आठवणी जोडल्या गेल्या आहेत. आमच्या संघासाठी यापूर्वीचे दोन तीन सीझन चांगले गेले नाहीत पण आम्ही त्यामध्ये बदल करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असं रोहितनं म्हटलं.
मुंबईनं पहिल्यांदा जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव त्यानंतर रोहित शर्मा ला रिटेन केलं. या रिटेन्शन स्पॉटबाबत रोहितनं भाष्य केलं. मी या फॉरमॅटमधून निवृत्त झालो आहे. मला वाटतं तो रिटेन्शन स्पॉट माझ्यासाठी योग्य आहे. जे खेळाडू राष्ट्रीय संघांसाठी खेळतात त्यांना प्राधान्य मिळायला हवं, असा माझा विश्वास आहे, मी यामध्येच आनंदी आहे, असं देखील रोहित शर्मानं म्हटलं.
हार्दिक पांड्यानं देखील त्याचा प्रवास मुंबईतून सुरु केल्याचं म्हटलं, मला इथं खूप प्रेम मिळालं असं देखील तो म्हणाला. माझ्या आयुष्यात जे मिळवलं आहे ते मुंबई इंडियन्सचा भाग म्हणून मिळवल्याचं हार्दिकनं म्हटलं. प्रत्येक वर्ष विशेष वर्ष असतं, आगामी वर्ष देखील विशेष असेल, असं हार्दिक पांड्यानं म्हटलं.
जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा या पाच जणांना मुंबईनं रिटेन केलं आहे. यावर देखील हार्दिक पांड्यानं भाष्य केलं.आमच्यामध्ये बंधुभाव, मैत्री असल्याचं देखील तो म्हणाला.
मुंबईकडे उरले 45 कोटी
मुंबई इंडियन्सनं जसप्रीत बुमराहला 18 कोटी, सूर्यकुमार यादवला 13.35 कोटी, हार्दिक पांड्याला 13.35 कोटी रुपये खर्च करुन रिटेन केलं आहे. रोहित शर्मासाठी त्यांनी 13.30 कोटी रुपये खर्च केले. तर, तिलक वर्मासाठी 8 कोटी रुपये खर्च केले आहेत. म्हणजेच रिटेन्शनमध्ये मुंबईनं 75 कोटी रुपये खर्च केले आहेत. आता मुंबईकडे मेगा ऑक्शनमध्ये खर्च करण्यासाठी केवळ 45 कोटी रुपये उपलब्ध असतील.
दरम्यान, मुंबई इंडियन्सची कामगिरी येत्या आयपीएलमध्ये तरी चांगली होणार का याकडे मुंबईच्या चाहत्यांचं लक्ष लागंल आहे.
इतर बातम्या :