(Source: ECI/ABP News/ABP Majha)
यंदा तरी आरसीबीचे स्वप्न पुर्ण होणार का? IPL फायनलमध्ये तीन वेळा मिळालाय पराभव
IPL 2022 Qualifier 2 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) आज आयपीएल 2022 चा दुसरा क्वालीफायर सामना होणार आहे.
IPL 2022 Qualifier 2 : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) आज आयपीएल 2022 चा दुसरा क्वालीफायर सामना होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (Royal Challengers Bangalore) आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यामध्ये करो या मरोची लढत होतेय. संध्याकाळी साडेसात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. सात वाजता नाणेफेक होणार आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाचे आव्हान संपुष्टात येणार आहे तर विजेता संघ 29 मे रोजी गुजरातसोबत दोन हात करणार आहे. करो या मरोच्या लढतीत आरसीबीने राजस्थानचा पराभव केला तर ते चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहचतील. याआधी तीन वेळा आरसीबी आयपीएलची फायनल खेळली आहे. पण प्रत्येकवेळा त्यांचं स्वप्न तुटलेय.
2009 -
आयपीएलच्या दुसऱ्या हंगामात म्हणजेच 2009 मध्ये आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली होती. या सामन्यात डेक्कन चार्जर्सने आरसीबीचा पारभव केला होता. वानखेडे स्टेडिअमवर झालेल्या सामन्यात आरसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. डेक्कन चार्जर्सने प्रथम फलंदाजी करताना सहा गड्यांच्या मोबदल्यात 143 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीचा संघ 137 धावांपर्यंत मजल मारु शकला.. रोमांचक सामन्यात डेक्कन चार्जर्सने 6 धावांनी विजय मिळवला होता.
2011 -
आयपीएलच्या चौथ्या हंगामात चेन्नईने आरसीबीचे स्वप्न धुळीस मिळवले होते. चेन्नईच्या एम ए चिदंबरम स्टेडियममध्ये धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेनं प्रथम फलंदाजी करताना पाच गड्यांच्या मोबदल्यात 205 धावा केल्या. आरसीबीचा संघ 147 धावांपर्यंत मजल मारु शकला.. चेन्नईने फायनलमध्ये आरसीीचा 58 धावांनी पराभव केला.
2016 -
आयपीएल 2016 मध्ये विराट कोहलीच्या तुफानी फॉर्मच्या बळावर आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली होती. पण सनराइजर्स हैदराबादने आरसीबीचं स्वप्न धुळीस मिळवले. हैदराबादने प्रथम फंलदाजी करताना सात गड्यांच्या मोबदल्यात 208 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तरदाखल आरसीबीच्या संघाचे कडवी टक्कर दिली. आरसीबीचा संघ 200 धावांपर्यंत मजल मारु शकला.. हैदराबादने आठ धावांने सामना जिंकत चषकावर नाव कोरले.