IPL 2023, DC : 'गांगुलीला हे सोपं वाटलं असेल'; सलग 5 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव, रवी शास्त्रींचा मेंटरवर निशाणा
DC's 5 Consecutive Losses : आयपीएल 2023 (IPL 2023) मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सलग 5 पराभवानंतर रवी शास्त्रींनी सौरव गांगुलीला धारेवर धरलं आहे.
Ravi Shastri on Saurav Ganguly : यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL 2023) दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाची परिस्थिती सर्वात वाईट आहे. दिल्ली कॅपिटल्स (DC) हा आयपीएल 2023 मधील आतापर्यंतचा सर्वात अयशस्वी संघ म्हणण्याची वेळ आली आहे कारण, या मोसमात दिल्ली संघाला अद्याप एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटर सौरव गांगुली यांना धारेवर धरलं आहे.
शून्य गुणांसह दिल्ली संघ अजूनही गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर स्थिर आहे. दिल्ली कॅपिटल्सला आयपीएल 2023 मधील पाचव्या सामन्यात शनिवारी (15 एप्रिल) रॉयल चॅलेंजर्श बंगळुरु संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली बंगळुरु विरोधात उतरला पण संघाचे फलंदाज क्रीजवर टिकू शकले नाहीत. त्यांनी पॉवरप्ले दरम्यान 4 झटपट विकेट गमावल्या.
दिल्ली कॅपिटल्सचा सलग पाच वेळा पराभव
दिल्ली कॅपिटल्स संघाला आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत एकही विजय मिळवता आलेला नाही. सलग पाच सामन्यांत दिल्लीचा पराभव झाला आहे. यामुळे संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर यांच्यासह इतर खेळाडूंवर मोठ्या प्रमाणात टीका होते आहे. मात्र, या पराभवाचं खापर रवी शास्त्री यांनी सौरव गांगुलीवर फोडलं आहे. भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटर सौरव गांगुलीवर टीकास्त्र डागलं आहे.
दिल्ली संघांच्या खराब कामगिरीवर का म्हणाले रवी शास्त्री?
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री म्हणाले की, ''इतर संघ वेगाने पुढे जात असताना सलग पाच सामन्यांमध्ये पराभव ही दिल्लीसाठी चिंताजनक बाब आहे. आयपीएलमध्ये सलग पाच सामने गमावल्यानंतर संघाला स्पर्धेत पुनरागमन करणं काहीसं अवघड होतं. दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याआधी नेहमी विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. पण आता त्याला सलग पराभव स्वीकारावा लागतो. स्पर्धेत एखादा संघ हरतो पण दिल्ली संघ मात्र एकतर्फी पराभूत होत आहात. त्यांनी कदाचित विजयाची आशा देखील सोडली आहे.”
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्ली कॅपिटल्सचा संघ
आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघ डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वात खेळत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा नियमित कर्णधार रिषभ पंत याच्या अपघातानंतर त्याला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे तो यंदा आयपीएलमधून बाहेर आहे. पण वॉर्नरच्या नेतृत्वात दिल्लीली काही खास कामगिरी करता आलेली नाही. यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत झालेल्या पाच सामन्यामध्ये दिल्ली कॅपिटल्स हाती मात्र पराभव आला आहे. आयपीएल 2023 मध्ये पहिल्याच सामन्यात लखनौ संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दुसऱ्या सामन्यात गुजरात टायटन्स दिल्लीवर वरचढ ठरला. त्यानंतरच्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्सकडून दिल्लीला पराभवाचा सामना करावा लागला. मुंबईविरुद्धच्या सामन्यातही दिल्लीला विजय मिळवण्यात अपयश आलं. मागील सामन्यात बंगळुरुकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
रवी शास्त्रींची सौरव गांगुलीवर टीका
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी संघाचे मेंटर सौरव गांगुलीवर निशाणा साधला आहे. रवी शास्त्री म्हणाले की, 'सौरव गांगुली यांना वाटलं असेल ही गोष्ट फार सोपी आहे. पण, असं नाही. या स्पर्धेसाठी तुम्हाला योग्य रणनीती आखावीच लागते.' सौरव गांगुली यंदाच्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे मेंटर आणि ऑपरेशन हेड आहेत.