IPL 2024 : राहुल द्रविड आयपीएल संघाचा कोच होणार? लवकरच घोषणा होण्याची शक्यता
ICC Cricket World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप संपला, त्यासोबतच राहुल द्रविडचा मुख्य कोच म्हणून कार्यकाळही संपुष्टात आला.

ICC Cricket World Cup 2023: वनडे वर्ल्ड कप संपला, त्यासोबतच राहुल द्रविडचा मुख्य कोच म्हणून कार्यकाळही संपुष्टात आला. राहुल द्रविडला कार्यकाळ वाढवण्याची संधी आहे, पण त्याने रस नसल्याचे बीसीसीआयला सांगितल्याचे समोर आलेय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रविडला आता जास्त प्रवास करायचा नाही. त्याला कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. त्यामुळेच तो टीम इंडियासोबतचा कार्यकाळ वाढवणार नाही. पण रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड आयपीएल संघासोबत जोडला जाऊ शकतो.
रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड आयपीएलमधील एखाद्या फ्रेंचायजीसोबत जोडला जाण्याची शक्यता आहे. टाइम्स ऑफ इंडियाला सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल द्रविड आयपीएल संघासोबत दोन वर्षांच्या करारासाठी चर्चा करत आहे. ही बातमी खरी असेल तर पुढील आयपीएल सीझनमध्ये द्रविड पुन्हा शिकवणी देताना दिसेल. याबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
कोणत्या आयपीएल संघाला राहुल शिकवणी देणार?
सध्या दिल्ली कॅपिटल्सकडे मुख्य प्रशिक्षक नाही. कारण मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्याशिवाय राजस्थान रॉयल्स संघाचा मुख्य प्रशिक्षक कुमार संगकारा यांनीही सोडचिठ्ठी दिली. त्यामुळे या दोन संघांपैकी एकाशी द्रविडची चर्चा सुरु असल्याची शक्यता आहे. राहुल द्रविडने राजस्थान रॉयल्ससोबत आयपीएलमध्ये बराच वेळ घालवला आहे. त्याने या आयपीएल संघाचे नेतृत्वही केलेय. अशा स्थितीत राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा नवा मुख्य प्रशिक्षक होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
दरम्यान, राहुल द्रविडचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ टीम इंडियासाठी शानदार राहिला आहे. 2021 टी 20 विश्वचषकानंतर त्याने धुरा संभाळली होती. त्यानंतर पुढील दोन वर्ष त्याने टीम इंडियाला शिकवणी दिली. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी 20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय 2021-23 चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही गाठली. तसेच 2023 विश्वचषक फायनलही गाठली होती. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने लागोपाठ 10 सामन्यात विजय मिळवला होता.
राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपला
यंदाच्या विश्वचषकासोबतच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळही संपुष्टात आला आहे. विश्वचषकाचा अंतिम सामना हा राहुल द्रविड यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळातील शेवटचा सामना होता. अशा परिस्थितीत राहुल द्रविड भविष्यात टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदी कायम राहणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र, मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुल द्रविड स्वतः टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहण्यास इच्छुक नसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.
राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला आहे. पण आता त्यांना आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे आणि तो भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षकपदी कायम राहिल्यास, हे शक्य होणार नाही, त्यामुळे राहुल द्रविड मुख्य प्रशिक्षकपदी कायम राहण्यास इच्छुक नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
