नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
KKR vs RR, IPL 2024 : सुनील नारायणच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) निर्धारित 20 षटकांमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 223 धावांचा डोंगर उभरला.
KKR vs RR, IPL 2024 : सुनील नारायणच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकाता नाईट रायडर्सनं (KKR) निर्धारित 20 षटकांमध्ये सहा विकेटच्या मोबदल्यात 223 धावांचा डोंगर उभरला. कोलकात्याकडून सुनील नारायण यानं 109 धावांची केळी केली. त्याशिवाय रघुवंशी या युवा फलंदाजानं 18 चेंडूमध्ये 30 धावांचं योगदान दिलं. त्याशिवाय कोलकात्याच्या एकाही फलंदाजाला 30 धावसंख्या पार करता आली नाही. राजस्थान रॉयल्सकडून आवेश खान आणि कुलदीप सेन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. राजस्थानला विजयासाठी 224 धावांचे विराट आव्हान मिळालेय.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आवेश खान यानं फिलीप सॉल्ट याला बाद करत हा निर्णय योग्य असल्याचं दाखवून दिलं. पण सुनील नारायण यानं राजस्थानच्या गोलंदाजांचा समाचार घेत कोलकात्याला सामन्यात आणलं. सॉल्ट यानं 10 धावा केल्या. रघुवंशी यानं 18 चेंडूमध्ये झटपट 30 धावांचं योगदान दिले. त्यानं आपल्या खेळीमध्ये पाच चौकार लगावले. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला सुनील नारायण यानं चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
सुनील नारायणचं पहिलं शतक -
सुनील नारायण यानं आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. नारायण यानं राजस्थानच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. एका बाजूला ठरावीक अंतरानं विकेट पडत होत्या, पण दुसऱ्या बाजूला असणाऱ्या नाराय़ण याची फटकेबाजी सुरुच होती. नारायण यानं 56 चेंडूमध्ये 109 धावांची खेळी केली. नारायण यानं कोलकात्यासाठी तिसरं शतक ठोकलं. नाराय़ण यानं आपल्या शतकी खेळीमध्ये सहा षटकार आणि 13 चौकार लगावले आहेत. सुनील नारायणच्या शतकी खेळीच्या बळावर कोलकात्यानं 223 धावांपर्यंत मजल मारली.
April is a lucky month for us! 💯 pic.twitter.com/ypZucfpDbZ
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 16, 2024
कोलकात्याच्या इतर फलंदाजांकडून निराशा -
सुनील नारायण आणि रघुवंशी यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. कोणताही फलंदाज 30 धावसंख्या पार करु शकला नाही. अखेरीस रिंकू सिंह यानं 9 चेंडूमध्ये 20 धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि एका चौकाराचा समावेश होता. वेंकटेश अय्यर 8, आंद्रे रसेल 13, श्रेयस अय्यर 11 धावांची खेळी केली.