(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5 वेळा IPL चषक जिंकला, तरीही मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं?
Mumbai Indian Captain : आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार करत सर्वांनाच धक्का दिला.
Mumbai Indian Captain : आयपीएल लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला मुंबईचा कर्णधार करत सर्वांनाच धक्का दिला. रोहित शर्माने मुंबईला पाचवेळा आयपीएलचे जेदेपद मिळवून दिले. तरीही रोहित शर्माकडून कर्णधारपद का काढलं? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. याबाबतची कारणे जाणून घेऊयात...
मागील तीन हंगामात खराब कामगिरी -
मुंबई इंडियन्सने 2020 मध्ये अखेरची आयपीएल जिंकली होती. त्यानंतर मुंबईच्या संघाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. 2021 आणि 2022 मध्ये मुंबईच्या संघाला प्लेऑफमध्येही स्थान पटकावता आले नाही. 2022 मध्ये मुंबईचा संघ तळाला राहिला होता. 2023मध्येही मुंबईच्या संघाने रडत रडत क्वालिफाय केले होते. पण फायनलपर्यंत पोहचता आले नाही. मागील तीन हंगामात मुंबई इंडियन्सचा आलेख वाढलाच नाही.
रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा खराब काळ -
मागील तीन हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात धार दिसली नाही, त्यामुळे मुंबई इंडियन्सला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. यादरम्यान रोहित शर्माने भारतीय संघाचे नेतृत्व संभाळले. पण त्याला तीन आयसीसी चषकात विजय मिळवता आला नाही. गेल्या दोन-तीन वर्षांत रोहितचा टीम इंडियासाठी आणि फ्रेंचायझीसाठी अलीकडचा कर्णधारपदाचा विक्रम खरोखरच कमकुवत आहे. मुंबईने रोहितला हटवण्याचा निर्णय घेण्यामागे हे एक मोठे कारण असू शकते.
टी 20 मध्ये बेरंग दिसला रोहित -
मागील काही वर्षांपासून रोहित शर्माला टी 20 क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करता आली नाही. गेल्यावर्षभरापासून रोहित शर्माने एकही टी 20 सामना खेळला नाही. 2023 आयपीएलमध्ये रोहित शर्मा अखेरचा टी 20 सामना खेळला होता. तर 2022 पासून आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये रोहित शर्माला प्रभावी कामगिरी करता आली नाही. आयपीएलमध्येही गेल्या दोन हंगामात त्याची फलंदाजी कमकुवत राहिली. या वर्षी तो एकही टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. कर्णधारपद काढण्यामागे हे एक प्रमुख कारण अशू शकते.
रोहितचं आयपीएल करियर -
रोहित शर्मा आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाच आयपीएल चषकावर नाव कोरलेय. 2013 पासून रोहित शर्माने मुंबईची धुरा संभाळली होती. 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने चषकावर नाव कोरले होते. रोहित शर्माची आयपीएलमधील कामगिरीही शानदार राहिली आहे. रोहितने 243 सामन्यात 6211 धावा चोपल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. रोहित शर्माने 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते.
हार्दिकची निवड का केली ?
हार्दिक पांड्याने गुजरातची धुरा संभाळताच पदार्पणातच चॅम्पियन केले, इतकेच नाही तर दुसऱ्या हंगामात उपविजेतेपद मिळवले. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात संघाने सातत्याने शानदार कामगिरी केली. त्याशिवाय टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी टीम इंडियाचे नेतृत्वही हार्दिक पांड्याच्या खांद्यावर आहे. त्याने लागोपाठ भारतीय संघाला विजय मिळवून दिलाय. अशा स्थितीत रोहित शर्माच्या जागी मुंबईला हार्दिक पांड्या शानदार रिप्लेसमेंट वाटली.
हार्दिक पांड्या आयपीएल 2022 पासून शानदार लयीत आहे. त्याने मागील दोन हंगामात गोलंदाजी आणि फलंदाजीत दमदार प्रदर्शन केलेय. दीड वर्षात आंतरराष्ट्रीय स्तरावरही वनडे आणि टी 20 मध्ये हार्दिकने प्रभावी कामगिरी केली आहे. शानदार प्रदर्शन करत त्याने टीम इंडियाची धुराही यशस्वी संभाळळी, त्यामुळेच संघाचा आत्मविश्वासही वाढला. त्यामुळेच मुंबईने हार्दिक पांड्यावर डाव खेळलाय.