(Source: ECI/ABP News/ABP Majha)
KKR vs DC : कोलकाता नाईट रायडर्सचा 'दिल्ली'वर विजय; वरुण चक्रवर्ती मॅचचा हिरो
आयपीएल 2020 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 59 धावांनी पराभव. कोलकाता नाईट रायडर्सकडून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीची शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 20 धावा देऊन पाच बळी घेतले.
KKR vs DC : आयपीएल 2020 च्या 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटलसचा 59 धावांनी पराभव केला. या हंगामात केकेआरचा हा सहावा विजय आहे. असे असतानाही कोलकाता पॉइंट टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावरचं राहिला आहे. कोलकाताकडून मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी केली. त्याने चार षटकांत केवळ 20 धावा देऊन पाच बळी घेतले. आयपीएलमध्ये पाच बळी घेणारा तो दुसरा गोलंदाज ठरला आहे.
तत्पूर्वी, दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताची सुरुवात खराब झाली. दुसर्या षटकात 11 धावसंख्या असताना चांगल्या फॉर्ममध्ये असलेला शुभमन गिल 09 धावा काढून बाद झाला. त्याची शिकार एनरिक नॉर्टजेने केली. यानंतर सहाव्या षटकात 35 धावसंख्येवर तिसर्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या राहुल त्रिपाठीही 13 धावा करुन बाद झाला.
दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार इयन मॉर्गनने दिनेश कार्तिकला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. परंतु, कार्तिकची बॅट आजही शांत राहिली आणि अवघ्या 3 धावा काढून तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
42 धावांत तीन बळी पडल्यानंतर मॉर्गनने सुनील नारायणला फलंदाजीसाठी पाठवले. इथून सामन्याचं पारडं बदलायला सुरुवात झाली. राणासमवेत सुनीलने चौथ्या विकेटसाठी 115 धावांची भागीदारी केली. सुनीलने 32 चेंडूत 64 धावा केल्या. यात त्याच्या सहा चौकार आणि चार षटकारांचा समावेश आहे. तर राणाने 53 चेंडूत 81 धावांची खेळी केली. यात त्याने 13 चौकार आणि एक षटकार लगावला. शेवटी कर्णधार मॉर्गनने 9 चेंडूत 17 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 190 पर्यंत पोहोचवली. त्याने दोन चौकार आणि एक षटकार लगावला.
एनरिक नॉर्टजेने दिल्लीकडून चांगली गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ 27 धावा देऊन दोन बळी घेतले. या व्यतिरिक्त मार्कस स्टोईनिस कागिसो रबाडाने दोन गडी बाद केले.
IPL 2020 : इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईवर आली 'ही' नामुष्की, धोनी म्हणाला, हे वर्ष आमचं नाही
कोलकाताने दिलेल्या 195 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीची सुरुवात वाईट झाली. पहिल्याच चेंडूवर खाते न उघडता अजिंक्य रहाणे पॅव्हेलियनमध्ये परतला. पॅट कमिन्सने त्याला आपली शिकार बनवलं. यानंतर तिसर्या षटकात शानदार फॉर्ममध्ये असलेला शिखर धवन अवघ्या सहा धावा काढून बाद झाला. कमिन्सने धवनला पॅव्हेलियनमध्येही पाठवले.
13 धावांमध्ये दोन विकेट पडल्यानंतर ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनी डाव सावरत 63 धावांची भागीदारी केली. परंतु, दोघेही वेगवान धावा करण्यात अपयशी ठरले. पंतने 33 चेंडूत 27 धावा केल्या. पंत बाद झाल्यानंतर शिमरन हेटमीयरही पाच चेंडूंत 10 धावा करून पॅव्हेलियनला परतला.
वरुण चक्रवर्ती याने एकट्याने संपूर्ण दिल्ली संघाचा पाडाव केला. पहिल्या दोन चेंडूंमध्ये वरुणने हेटमायर आणि अय्यरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर स्टोनिस (06) आणि अक्षर पटेल (09) हे वरुणचे बळी ठरले. अशा प्रकारे दिल्ली कॅपिटल्सला 20 षटकांत केवळ 135 धावा करता आल्या.
कोलकाताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीने शानदार कामगिरी केली. आयपीएलमध्ये पाच विकेट घेणारा तो दुसरा गोलंदाज आहे. त्याने चार षटकांत केवळ 20 धावा देऊन पाच बळी घेतले. याशिवाय पॅट कमिन्सनेही चार षटकांत 17 धावा देऊन तीन गडी बाद केले.