राजस्थानचं प्लेऑफमधील स्थान निश्चित, या संघाचीही दावेदार, MI, RCB ची काय स्थिती?
IPL 2024 Points Table : दिल्लीनं मुंबईचा पराभव करत प्लेऑफमधील स्पर्धा अधिक रंजक केली, तर आरसीबीने गुजरातचा पराभव करत आपलं प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय.
IPL 2024 Points Table : आयपीएल 2024 च्या प्लेऑफची शर्यत सध्या रोमांचक झाली आहे. शनिवारी दिल्लीनं मुंबईचा पराभव केला, त्यानंतर आरसीबीनं गुजरातचा दारुण पराभव केला, चेन्नईनेही हैदराबादचा पराभव करत टॉप 4 मध्ये स्थान पटकावलं. त्यामुळे गुणतालिकेत मोठी खळबळ झाली. प्लेऑफची समिकरणेही बदलली आहे. राजस्थान रॉयल्सने नऊ सामन्यात आठ विजय मिळवत प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित केले आहे.
शनिवारी दिल्लीनं मुंबईचा पराभव करत प्लेऑफमधील स्पर्धा अधिक रंजक केली, तर आरसीबीने गुजरातचा पराभव करत आपलं प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. सध्या प्लेऑफची शर्यत अतिशय रोमांचक झाली आहे. पाहूयात कोणत्या चार संघांनी प्लेऑफसाठी आपली दावेदारी मजबूत केली, त्याशिवाय कोणते संघ प्लेऑफच्या स्पर्धेत कायम आहेत.
प्लेऑफमध्ये यांची दावेदारी अधिक मजबूत -
संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सचं प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित झालेय. राजस्थान रॉयल्सनं आतापर्यंत आठ सामन्यात बाजी मारली, तर एकामध्ये पराभव झालाय. राजस्थानचे अद्याप पाच सामने शिल्लक आहेत. दुसरीके कोलकाता नाईट रायडर्सनेही प्लेऑफसाठी आपलं स्थान मजबूत केलेय. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या कोलकाता आणि सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या दिल्लीचे प्रत्येकी दहा दहा गुण आहेत. चेन्नई, हैदराबाद आणि लखनौ या संघाचेही दहा दहा गुण आहेत. म्हणजे फक्त नेटरनरेटचा फरकामुळे हे संघ पुढे मागे आहेत. आज दिल्ली आणि कोलकाता यांच्यातील विजेता संघ प्लेऑफच्या दिशेने एक पाऊल पुढे टाणार आहे.
या संघाचेही प्लेऑफकडे नजर...
राजस्थानशिवाय कोलकाता, चेन्नई आणि हैदराबाद हे तीन संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर आहेत. पण त्यांना दिल्ली आणि लखनौ यांच्याकडून कडवी टक्कर मिळत आहे.
त्याशिवाय गुजरात टायटन्स, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांचे प्लेऑफचे चान्सेस अद्याप संपलेले नाहीत. दहाव्या क्रमांकावर असणाऱ्या आरसीबीलाही अद्याप प्लेऑफच्या आशा आहेत. पण त्यांना उर्वरित सर्व सामन्यात विजय मिळवावा लागेल, त्याशिवाय इतर संघाच्या कामगिरीवरही अवलंबून रहावे लागेल. गुजरात, पंजाब, मुंबई आणि आरसीबी यांचं प्लेऑफमधील आव्हान कामय आहे, पण रस्ता तितका सोपा नाही.