मुंबई-लखनौच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा फेरबदल, दिल्ली तळाला, चेन्नईचीही घसरण!
IPL Points Table : मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली, तर लखनौने आपला तिसरा विजय नोंदवला. दुसरीकडे दिल्ली कॅपिट्ल्सचा चौथा पराभव पाहावा लागला. लखनौच्या विजयाचा फटका चेन्नईला झाला.
IPL 2024 Points Table : आयपीएल 2024 मध्ये रविवारी ( 7 एप्रिल) दोन सामने झाले. मुंबई-दिल्ली (MI vs DC) आणि लखनौ-गुजरात (LSG vs GT) यांच्यामध्ये रंगतदार लढती झाल्या. मुंबई इंडियन्सने पहिल्या विजयाची नोंद केली, तर लखनौने आपला तिसरा विजय नोंदवला. दुसरीकडे दिल्ली कॅपिट्ल्सचा चौथा पराभव पाहावा लागला. लखनौच्या विजयाचा फटका चेन्नईला बसला. ऋतुराज गायकवाडचा चेन्नई संघ चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. तर दिल्ली आणि आरसीबीचे संघ तळाला पोहचले आहेत.
मुंबईचा पहिला विजय -
हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील मुंबईने अखेर आयपीएल 2024 मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. सलग तीन पराभवानंतर मुंबईने आपला पहिला विजय नोंदवला. मुंबईने दिल्लीचा 29 धावांनी पराभव केला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 234 धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तरदाखल दिल्लीच्या संघाला 205 धावांपर्यंत मजल मारता आली. मुंबईने पहिला विजय मिळवताच गुणतालिकेतही मोठा फेरबदल झाला आहे. मुंबई संघाने दहाव्या क्रमांकावरुन आठव्या स्थानावर झेप घेतली आहे. मुंबईचे चार सामन्यात दोन गुण झाले आहेत.
लखनौची टॉप 4 मध्ये एन्ट्री -
केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स संघाने गुजरातचा पराभव करत टॉप 4 मध्ये प्रवेश केला आहे. लखनौने गुजरातचा 33 धावांनी पराभव केला. लखनौने प्रथम फलंदाजी करताना 163 धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर गुजरातला 130 धावांत रोखलं. लखनौच्या संघाने तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. लखनौच्या नावावर सहा गुण आहेत.
राजस्थान अव्वल -
आयपीएल 2024 मध्ये राजस्थान आणि कोलकाता संघ आतापर्यंत अजेय आहेत. राजस्थान संघाने 4 विजय मिळवले आहेत. 8 गुणांसह राजस्थान संघ अव्वल स्थानावर आहे. तर श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकात्यानं 3 विजयासह दुसरं स्थान पटकावलं आहे. लखनौ तिसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. चेन्नईला चार सामन्यात दोन विजय आणि दोन पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई संघ चार गुणासह चौथ्या क्रमांकावर विराजमान आहे. हैदराबाद, पंजाब या संघाचेही प्रत्येकी चार चार गुण आहेत. पण खराब रनरेटमुळे हैदराबाद आणि पंजाब संघ गुणतालिकेत अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
आरसीबी-दिल्ली तळाला -
शुभमन गिलच्या नेतृत्वातील गुजरातला पाच सामन्यात तीन पराभवाचा सामना करावा लागलाय. गुजरात चार गुणासह सातव्या स्थानावर विराजमान आहे. हार्दिक पांड्याच्या मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली. मुंबईचा संघ आठव्या स्थानावर आहे. आरसीबी आणि दिल्ली या संघाला पाच सामन्यात प्रत्येकी चार चार पराभवाचा सामना करावा लागलाय. हे संघ अनुक्रमे नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
IPL पॉईंट टेबल
अनुक्रमांक. | संघ | सामने | विजय | टाय | पराभव | गुण | नेटरनरेट |
---|---|---|---|---|---|---|---|
1. |
राजस्थान
RR
|
4 | 4 | 0 | 0 | 8 | 1.120 |
2. |
कोलकाता
KKR
|
3 | 3 | 0 | 0 | 6 | 2.518 |
3. |
लखनौ
LSG
|
4 | 3 | 0 | 1 | 6 | 0.775 |
4. |
चेन्नई
CSK
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | 0.517 |
5. |
हैदराबाद
SRH
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | 0.409 |
6. |
पंजाब
PBKS
|
4 | 2 | 0 | 2 | 4 | -0.220 |
7. |
गुजरात
GT
|
5 | 2 | 0 | 3 | 4 | -0.797 |
8. |
MI
|
4 | 1 | 0 | 3 | 2 | -0.704 |
9. |
आरसीबी
RCB
|
5 | 1 | 0 | 4 | 2 | -0.843 |
10. |
दिल्ली
DC
|
5 | 1 | 0 | 4 | 2 | -1.370 |