IPL 2024, MI vs CSK :ऋतुराज हार्दिक आमने सामने, मुंबई आणि चेन्नईच्या संभाव्य प्लेईंग इलेव्हनमध्ये कुणाला संधी?
MI vs CSK सुपर संडेला उद्या मुंबई अन् चेन्नई भिडणार आहेत. मुंबई इंडियन्सनं यापूर्वी दोन तर चेन्नई सुपर किंग्जनं तीन मॅचमध्ये विजय मिळवलेला आहे. हार्दिक पांड्या आणि ऋतुराज गायकवाड हे आमने सामने येतील.
मुंबई : आयपीएलमध्ये उद्या मुंबईतील वानखेडे स्टेडियमवमर मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) आमने सामने येणार आहेत. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांनी आतापर्यंत आयपीएलमध्ये पाच पाच वेळा विजेतेपद पटकावलं आहे. यापूर्वी रोहित शर्माकडे मुंबईचं तर चेन्नईचं नेतृत्त्व एमएस धोनीकडे असायचं. यंदाच्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि धोनी देखील नेतृत्त्व करत नाही. मुंबईचं नेतृत्त्व हार्दिक पांड्या तर चेन्नईचं नेतृत्त्व मराठमोळा ऋतुराज गायकवाड करतोय. चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच पैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्सनं पाच पैकी दोन सामन्यात विजय मिळवला आहे. चेन्नई सुपर किंग्ज गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सनं यंदाच्या आयपीएलमध्ये निराशाजनक सुरुवात केली होती.गुजरात टायटन्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रायल्स यांच्याकडून मुंबईचा पराभव झाला होता. सलग तीन मॅचमधील पराभावानंतर मुंबईनं दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं.यानंतर वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं.
दुसरीकडे ऋतुराज गायकवाड याच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलमध्ये पाच पैकी तीन मॅचमध्ये विजय मिळवला आहे. चेन्नईनं यापूर्वीच्या मुंबई इंडियन्स विरोधातील पाच पैकी चार मॅचमध्ये विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्या आयपीएलमध्ये 36 मॅच झालेल्या आहेत. यापैकी 20 मॅच मुंबई इंडियन्सनं जिंकल्या आहेत. दुसरीकडे चेन्नई सुपरकिंग्जनं 16 मॅच जिंकल्या आहेत.
चेन्नई सुपर किंग्जच्या बॉलर्स पुढं मुंबई इंडियन्सच्या तगड्या फलंदाजांना रोखण्याचं आव्हान असेल. रोहित शर्मा, ईशान किशन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, तिलक वर्मा, टीम डेविड, रोमारियो शेफर्ड यासारखे तगडे फलंदाज आहेत. मुंबईच्या या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारु न देण्याचं आव्हान चेन्नईच्या बॉलर्सपुढं असेल.
मुंबईच्या दिग्गज फलंदाजांना रोखण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. चेन्नईच्या गोलंदाजांनी होम ग्राऊंडवर चांगली कामगिरी केलेली आहे. मात्र, आता त्यांना वानखेडे स्टेडियमवर देखील चांगली कामगिरी करावी लागेल. दीपक चाहर, मथिशा पथिराना, शार्दुल ठाकूर, तीक्षाणा आणि तुषार देशपांडे यांना चांगली कामगिरी करावी लागेल.
चेन्नई सुपर किंग्जची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
ऋतुराज गायकवाड (कॅप्टन), राचीन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डेरिल मिशेल, समीर रिझवी, रवींद्र जाडेजा, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चाहर, मुस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे, मथिशा पथिराना
इम्पॅक्ट प्लेअर : शिवम दुबे, मोइन अली, शेख रशीद, मिशेल सेंटनर, शार्दुल ठाकूर
मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, ईशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कॅप्टन), टीम डेविड, रोमारियो शेफर्ड, मोहम्मद नबी, श्रेयस गोपाल, जसप्रीत बुमराह, गेराल्ड कोएत्जी, आकाश मढवाल
इम्पॅक्ट प्लेअर : सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई
दरम्यान, मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील मॅच उद्या सायंकाळी 7.30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु होईल. या मॅचचं प्रक्षेपण स्टार स्पोर्टसवरुन होईल तर जिओ सिनेमावरुन देखील ही मॅच पाहता येईल.
संबंधित बातम्या :
IPL 2024: नाव मोठं, लक्षण खोटं, महागड्या खेळाडूंनी वाट लावली, 17 कोटीच्या खेळाडूने तर लाज काढली!