CSK vs RR, Match Highlights: धोनी-जडेजाची खेळी व्यर्थ, राजस्थानचा 3 धावांनी विजय
IPL 2023, CSK vs RR: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा रॉयल पराभव केला.
IPL 2023, CSK vs RR: अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा रॉयल पराभव केला. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी 21 धावांची गरज होती. मैदानावर जगातील सर्वात मोठा फिनिशर धोनी आणि अष्टपैलू जाडेजा होते.. धोनीने संदीप शर्माच्या षटकात दोन षटकार मारत सामना फिरवलाही... पहिल्या तीन चेंडूवर सामना चेन्नईच्या बाजूने झुकला होता. पण संदीप शर्मा याने अखेरच्या तीन चेंडूवर सामना राजस्थानच्या बाजूने झुकवला. संदीप शर्मा याने यॉर्कर चेंडू फेकत धोनी आणि जाडेजा यांची बॅट शांत ठेवली. राजस्थानने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ 172 धावांपर्यंत मजल मारु शकला. धोनी आणि जाडेजा यांनी अखेरपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण संदीप शर्माच्या भेदक माऱ्यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. धोनीने या सामन्यात 17 चेंडूत 32 धावांची विस्फोटक खेळी केली. तर जाडेजाने 15 चेंडूत 25 धावांची खेळी केली. धोनी आणि जाडेजा यांनी 30 चेंडूत नाबाद 59 धावांची भागिदारी केली. पण या दोन्ही अनुभवी फलंदाजांना चेन्नईला विजय मिळवून देण्यात अपयश आले.
176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ फिरकीच्या जाळ्यात अडकला. राजस्थानच्या फिरकी त्रिकुटाने चेन्नईच्या फलंदाजांना ठरावीक अंतरावर बाद केले. तीन फिरकी गोलंदाजांनी पाच विकेट घेतल्या. 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईची सुरुवात खराब झाली. फॉर्मात असलेला ऋतुराज गायकवाडला संदीप शर्माने आठ धावांवर तंबूत झाडले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि डेवोन कॉनवे यांनी चेन्नईचा डाव साभांळला. दोघांनी 43 चेंडूत 68 धावांची भागिदारी केली. चेन्नईकडून ही सर्वात मोठी भागिदारी होती. कॉनवे आणि अजिंक्य ही जोडी जमली असे वाटत असतानाच अश्विन याने राजस्थानला विकेट मिळवून दिली. अश्विन याने अजिंक्य रहाणे याला 31 धावांवर तंबूत पाठवले. राहणे याने 19 चेंडूत 31 धावांची खेळी केली. यामध्ये एक षटकार आणि दोन चौकारांचा समावेश होता. अजिंक्य राहणे बाद झाल्यानंतर चेन्नईची फलंदाजी ढासळली. शिवम दुबे, मोईन अली, अंबाती रायडू एकापाठोपाठ एक बाद झाले. यांना दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. एका बाजूला डेवोन कॉनवे संयमी फलंदाजी करत होता. प्रति षटक धावसंख्या वाढल्यामुळे दबावात आलेला कॉनवेही बाद झाला. कॉनवे याने 38 चेंडूत अर्धशतकी खेळी केली. यामध्ये सहा चौकारांच समावेश होता.
113 धावांत सहा विकेट गमावल्यानंतर जाडेजा आणि धोनी या अनुभवी खेळाडूंनी मोर्चा सांभाळला. दोघांनी सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. फिरकी गोलंदाजांना मान दिला अन् वेगवान गोलंदाजांचा समाचार घेतला. धोनीने 17 चेंडूत तीन षटकारांसह आणि एका चौकारासह 32 धावांची खेळी केली. तर जाडेजाने दोन षटकार आणि एका चौकरासह 25 धावांची खेळी केली. धोनी आणि जाडेजा यांनी अखेरच्या चेंडूपर्यंत शर्थीचे प्रयत्न केले. पण राजस्थानने अटीतटीच्या लढतीत तीन धावांनी विजय मिळवला.
राजस्थानकडून युजवेंद्र चहल, आर. अश्विन आणि एडम झम्पा यांनी चेन्नईच्या पाच फलंदाजंाना बाद केले. त्याशिवाय धावगतीही रोखली. चहल आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.