(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2023 : बटलरचा झंझावात अन् संजू सॅमसनचे वादळ, राजस्थानची 214 धावांपर्यंत मजल
RR vs SRH, IPL 2023 : जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन याने नाबाद ६६ धावांचे योगदान दिले. हैदराबादला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान आहे.
RR vs SRH, IPL 2023: जोस बटलरची झंझावाती फलंदाजी आणि संजू सॅमसनची कर्णधाराला साजेशी खेळीच्या बळावर राजस्थानने निर्धारित २० षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २१४ धावांपर्यंत मजल मारली. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानावरील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. तर संजू सॅमसन याने नाबाद ६६ धावांचे योगदान दिले. हैदराबादला विजयासाठी २१५ धावांचे आव्हान आहे.
राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जोस बटलर आणि यशस्वी जायस्वाल यांनी वादळी सुरुवात केली. खासकरुन यशस्वी जायस्वाल याने फटकेबाजी केली. जोस बटलर याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पावरप्लेमध्ये यशस्वी जायस्वाल याने चौफेर फटकेबाजी केली. जयस्वाल याने १८ चेंडूत ३५ धावांची खेळी केली. या खेळीत जयस्वालने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. जयस्वाल आणि बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागिदारी केली.
यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर जोस बटलर याने आक्रमक रुप घेतले. कर्णधार संजू सॅमसनच्या साथीने राजस्थानची धावसंख्या हालती ठेवली. हैदराबादच्या गोलंदाजांचा बटलर आणि सॅमसन यांनी समाचार घेतला. दोघांनी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. संजू सॅमसन याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. जोस बटलर याने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी केली. संजू सॅमसन आणि जोस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८१ चेंडूत १३८ धावांची भागिदारी केली. अखेरीस भुवनेश्वर कुमारने जोस बटलरची खेळी संपुष्टात आणली. जोस बटलर याचे शतक थोडक्यात हुकले.
जोस बटलर याने ९५ धावांची खेळी केली. फक्त पाच धावांनी बटलरचे सहावे शतक हुकले.. बटलरने आतापर्यंत पाच शतके लगावली आहेत. भुवनेश्वर कुमार याच्या अप्रतिम चेंडूवर जोस बटलर बाद झाला. बटलरने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. पहिल्या २० चेंडूवर बटलरने फक्त २० धावा केल्या होत्या. त्यानंतर जोस बटलर याने आक्रमक रुप धारण केले. बटलरने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. बटलरने ५९ चेंडूत ९५ धावांची खेळी केली. या खेळीत बटलरने १० चौकार आणि चार षटकार लगावले.
जोस बटलर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन याने राजस्थानचा डाव २०० च्या पुढे नेहला. संजू सॅमसन याने सुरुवातीपासूनच वादळी फलंदाजी केली. संजू सॅमसन याने ३८ चेंडूत ६६ धावांची खेळी केली. या खेळीत संजू सॅमसन याने पाच षटकार आणि चार चौकार लगावले. संजू सॅमनच्या वादळी खेळीमुळे राजस्थानने २१४ धावांपर्यंत मजल मारली. शिमरोन हेटमार याने नाबाद सात धावांची खेळी केली.
हैदराबादकडून एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही. राजस्थानच्या वादळी फलंदाजीसमोर हैदराबादची गोलंदाजी कमकुवत आणि दुबळी जाणवत होती. भुवनेश्वर कुमार आणि मार्को यान्सन यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.