मुंबईला मोठा धक्का, जोफ्रा आर्चर चेन्नईविरोधात संघाबाहेर? CSK च्या माजी खेळाडूचा दावा
MI vs CSK, Jofra Archer : वानखेडेच्या मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात आज लढत होणार आहे.
MI vs CSK, Jofra Archer : वानखेडेच्या मैदानावर मुंबई आणि चेन्नई यांच्यात आज लढत होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्स आणि धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई यांच्यात ElClasico सामना रंगणार आहे. आज संध्याकाळी सामना रंगणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंनी नेटमध्ये कसून सराव केला. पण चेन्नईविरोधातील सामन्यापूर्वी मुंबईच्या चाहत्यांची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज चोफ्रा आर्चर आज खेळण्याची शक्यता कमी आहे. जोफ्रा आर्चर याला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. चेन्नई सुपर किंग्सचा माजी खेळाडू सुब्रमण्याम बद्रीनाथ याने याबाबतची माहिती दिली.
आयपीएलमध्ये समालोचन करणारा चेन्नईचा माजी खेळाडू सुब्रमण्यम बद्रीनाथ याने आपल्या युट्युब (YouTube) चॅनलवर जोफ्रा आर्चर याला दुखापत झाल्याचे सांगितलेय. YouTube चॅनलवर बोलताना बद्रीनाथ म्हणाला की,'चेन्नईविरोधातील सामन्यापूर्वी मुंबईसाठी एक वाईट बातमी आहे. वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर याच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे, त्यामुळे आज तो संघाबाहेर असेल. अशात हा मुंबईसाठी मोठा धक्का असेल...' दरम्यान, जोफ्रा आर्चरच्या दुखापतीवर अद्याप मुंबई इंडियन्सकडून कोणताही अधिकृत माहिती समोर आलेली नाही..
पहिल्या सामन्यात जोफ्राचा फ्लॉप शो -
मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यात पहिला सामना बेंगलोरमध्ये झाला होता. या सामन्यात आरसीबीने मोठा विजय मिळवला होता. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी दमदार फलंदाजी केली होती. या दोघांनी मुंबईच्या प्रत्येक गोलंदाजाचा सामाचार घेतला होता. विराट कोहलीपुढे जोफ्रा आर्चर फिका दिसत होता. त्याला चांगली गोलंदाजी करता आली नाही. चार षटकात जोफ्रा आर्चर याने 33 धावा खर्च केल्या होत्या. जोफ्रा आर्चर याला एकही विकेट घेता आली नव्हती.
पहिल्या विजयासाठी मुंबई मैदानात उतरणार -
आयपीएलच्या सोळाव्या हंगामातील पहिल्या सामन्यात मुंबईला आठ विकेटने पराभवाचा सामना करावा लागला होता.. या सामन्यात मुंबईची गोलंदाजी फिकी पडली होती. मुंबईच्या एकाही गोलंदाजाला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. आरसीबीने दोन विकेटच्या मोबदल्यात 172 धावांचे लक्ष आरामात पार केले होते. आज मुंबई आयपीएलच्या 16 व्या हंगमातील पहिला विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दोन वर्षानंतर मुंबई आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहे. त्यातच आघाडीचा गोलंदाज दुखापतीमुळे बाहेर गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे मुंबईच्या अडचणी वाढल्या आहेत. आज अर्जुन तेंडुलकर आयपीएल पदार्पण करणार का? याची चर्चा सुरु झाली आहे.