KKR vs RCB, 1 Innings Highlight : लॉर्ड शार्दुल ठरला संकटमोचक! कोलकात्याची 204 धावांपर्यंत मजल
IPL 2023, KKR vs RCB : रहमानुल्लाह गुरबाजची दमदार सलामी आणि लॉर्ड शार्दुलच्या फिनिशिंगच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या.
IPL 2023, KKR vs RCB : रहमानुल्लाह गुरबाजची दमदार सलामी आणि लॉर्ड शार्दुलच्या फिनिशिंगच्या जोरावर कोलकाताने निर्धारित 20 षटकात 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. लॉर्ड शार्दुल ठाकूर याने 68, रहमानुल्लाह गुरबाज याने 57 तर रिंकू सिंह याने 46 धावांची खेळी केली. आरसीबीकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. कोलकाताने आरसीबीला विजयासाठी 205 धावांचे आव्हान दिले आहे.
रहमानुल्लाह गुरबाजचे अर्धशतक -
एका बाजूला विकेट पडत असताना सलामी फलंदाज रहमानुल्लाह गुरबाज याने संयमी खेळी केली. रहमानुल्लाह गुरबाज याने 44 चेंडूत 57 धावांचे योगदान दिले. संघातील आघाडीचे फलंदाज बाद होत असताना रहमानुल्लाह गुरबाज याने धावसंख्या हालती ठेवली. रहमानुल्लाह गुरबाज याने 3 षटकार आणि 6 चौकारांच्या मदतीने 57 धावंची खेळी केली.
शार्दुलचा फिनिशिंग टच -
आंद्रे रसेल बाद झाल्यानंतर लॉर्ड शार्दुल ठाकूर मैदानात आला. कोलकात्याचा संघ अडचणीत होता. रसेलने निराश केल्यानंतर शार्दुल ठाकूर याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. शार्दुल ठाकूर याने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. शार्दुलने मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावले. शार्दुल ठाकरू याने 29 चेंडूत 68 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान शार्दुल ठाकूर याने तीन षटकार आणि 9 चौकार लगावले. शार्दुलच्या विस्फोटक खेळीमुळे कोलकाता संघाने 200 धावांचा पल्ला ओलांडला.
रिंकूची चांगली साथ -
शार्दूल ठाकूर याने आक्रमक रुप धारण करत धावांचा पाऊस पाडला. मैदानाच्या चोहूबाजूने चौकार आणि षटकार लगावत असलेल्या शार्दूल ठाकूरला रिंकूने चांगली साथ दिली. रिंकूने 33 चेंडूत 46 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. अखेरच्या षटकात धावा चोपण्याच्या नादात रिंकू सिंह बाद झाला.
दिग्गजांचा फ्लॉप शो -
आरसीबीच्या भेदक माऱ्यापुढे कोलकात्याच्या फलंदाजांनी नांगी टाकली. वेंकटेश अय्यर, मनदीप सिंह, कर्णधार नितीश राणा, आंद्रे रसेल यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. वेंकटेश अय्यर 3 आणि नितीश राणा 7 धावा काढून बाद झाले. तर विस्फोटक आंद्रे रसेल आणि मनदीप सिंह यांना खातेही उघडता आले नाही. दिग्गज फलंदाज बाद झाल्यामुळे कोलकात्याचा संघ अडचणीत सापडला होता. पण शार्दुल ठाकूर आणि रिंकू सिंह यांनी दमदार भागिदारी करत कोलकात्याचा डाव सावरला.
रिंकू-शार्दुलची निर्णायक शतकी भागिदारी -
कोलकात्याचा अर्धा संघ 90 धावांच्या आत तंबूत परतल्यानंतर रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी दमदार फलंदाजी केली. शार्दुल ठाकूर याने धावांचा पाऊस पाडला तर रिंकूने शार्दुल याला चांगली साथ दिली. दोघांनी धावांचा पाऊस पाडत शतकी भागिदारी केली. केकेआर 150 धावांपर्यंत जाईल की नाही, यात साशंकता होती. पण शार्दुल आणि रिंकू यांच्या भागिदारीच्या जोरावर कोलकाताने 200 धावांचा पल्ला पार केला. रिंकू सिंह आणि शार्दुल ठाकूर यांनी 47 चेंडूत 103 धावांची भागिदारी केली. शार्दूल आणि रिंकू यांच्या भागिदारीमुळे कोलकात्याने दमदार पुनरागमन केले.
कोलकात्याची गोलंदाजी कशी ?
कोलकात्याकडून डेविड विली आणि कर्ण शर्मा यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. डेविड विली याने चार षटकात 16 धावा दिल्या. तर कर्ण शर्मा यानेतीन षटकात 26 धावा खर्च केल्या. मेहम्मद सिराज आणि हर्षल पटेल महागडे गोलंदाज ठरले. सिराजने चार षटकात 44 धावा खर्च केल्या. तर हर्षल पटेल याने तीन षटकात 38 धावा केल्या.