(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs MI, Match Highlights : फिरकीच्या जाळ्यात अडकली मुंबई, गुजरातचा 55 धावांनी विजय
IPL 2023, GT vs MI: हार्दिक पांड्याच्या गुजरातने रोहित शर्माच्या मुंबईचा 55 धावांनी पराभव केला.
IPL 2023, GT vs MI: हार्दिक पांड्याच्या गुजरातने रोहित शर्माच्या मुंबईचा 55 धावांनी पराभव केला. 208 धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संघ निर्धारित 20 षटकात 9 विकेटच्या मोबद्लयात 152 धावांपर्यंत मजल मारु शकला. गुजरातच्या फिरकीच्या जाळ्यात मुंबईचा संघ अडकला. राशिद खान आणि नूर अहमद यांनी मुंबईच्या पाच फलंदाजांना तंबूत पाठले. गुजरातचा सात सामन्यात हा पाचवा विजय होय... गुजरातने गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. दुसरीकडे मुंबईचा संघाचा सात सामन्यात हा चौथा पराभव झालाय.
208 धावांचा पाठलाग करणाऱ्या मुंबईची सुरुवात निराशाजनक झाली. कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्या याने रोहित शर्मा याला दोन धावांवर झेलबाद केले. अवघ्या चार धावांवर मुंबईला पहिला धक्का बसला. त्यानंतर मुंबईचा डाव सावरण्याची जबाबदारी ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांच्या खांद्यावर आली. पण 208 धावांचा पाठलाग करताना ईशान किशन अतिशय संथ फलंदाजी करत होता. त्याचा स्ट्राईक रेट 100 इतका सुद्धा नव्हता. ईशान किशन याा राशिद खान याने तंबूचा रस्ता दाखवला. ईशान किशन याने 21 चेंडूत फक्त 13 धावांचे योगदान दिले.
ईशान किशन बाद झाल्यानंतर भन्नाट फॉर्मात असलेला तिलक वर्मा मैदानावर आला. पण त्याला इम्पॅक्ट पाडता आला नाही. राशिद खान याने तिलक वर्माला बाद करत मुंबईला मोठा धक्का दिला. तिलक वर्मा फक्त दोन धावा काढून बाद झाला. तिलक वर्मा बाद झाल्यानंतर कॅमरुन ग्रीनही तंबूत परतला. नूर अहमद याने ग्रीनला बाद केले. कॅमरुन ग्रीन याने 26 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले. यामध्ये तीन षटकारांचा समावेश आहे.
सूर्यकुमार यादव यालाही मोठी खेळी करता आली नाही. नूर अहमदच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार यादव बाद झाला. सूर्यकुमार यादव याने 12 चेंडूत 23 धावांची खेळी केली. या छोटेखानी खेळीत सूर्यकुमार यादव याने तीन चौकार आणि एक षटकार लगावला. मुंबईचा संघ अडचणीत असताना टीम डेविडही स्वस्ता तंबूत परतला. डेविडला खातेही उघडता आले नाही. नूर अहमद याने त्याला शून्यावर तंबूत धाडले.
लागोपाठ विकेट पडल्यानंतर मुंबईचा डाव लगेच संपतोय की काय असे वाटले... पण नेहाल वढेरा आणि पीयुष चावला यांनी मुंबईचा डाव सावरला. दोघांनी सन्मानजक धावसंख्या उभारली. पीयुष चावला याने 12 चेंडूत 18 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने एक षटकार आणि एक चौकार लगावला. नेहाल वढेरा याने 21 चेंडूत 40 धावांचे महत्वपूर्ण योगदान दिले. वढेरा याने आपल्या या खेळीत तीन षटकार आणि तीन चौकार लगावले. चावला आणि वढेरा यांच्या खेळीच्या बळावर मुंबईने सन्मानजक धावसंख्या उभारता आला. मुंबईकडून ही सर्वात मोठी भागिदारी ठरली. चावला-वढेरा यांनी सातव्या विकेटसाठी 24 चेंडूत 45 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव आणि वढेरा यांच्यात सहाव्या विकेटसाठी 14 चेंडूत 31 धावांची भागिदारी झाली. तर ईशान किशन आणि कॅमरुन ग्रीन यांच्यात दुसऱ्या गड्यासाठी 33 चेंडूत 39 धावांची भागिदारी केली. अर्जुन तेंडुलकर याने 9 चेंडूत 13 धावांची खेळी केली. या खेळीत एका षटकारांचा समावेश आहे.
फिरकीच्या जाळ्यात अडकला मुंबईचा संघ -
गुजरातच्या फिरकी गोलंदाजाच्या जाळ्यात मुंबईचा संघ अडकला. राशिद खान आणि नूर अहमद या दोघांनी मुंबईचा अर्धा संघ तंबूत पाठवला. राशिद खान याने चार षटकात 27 धावांच्या मोबदल्यात दोन विकेट घेतल्या. तर नूर अहमद याने चार षटकात 37 धावा खर्च करत तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. मोहम्मद शमीने चार षटकात फक्त 18 धावा दिल्या. हार्दिक पांड्याने दोन षटकात 10 धावा देत एक विकेट घेतली. जोश लिटिल याने दोन षटकात 18 धावा खर्च केल्या. मोहित शर्मा याने मुंबईच्या दोन फलंदाजांना तंबूत धाडले.