IPL 2022 : श्रेयस अय्यरची कमाल, दहा वर्षानंतर वानखेडेवर कोलकाता जिंकला
IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पण कोलकाता संघाचा वानखेडे स्टेडिअमवरील हा फक्त दुसरा विजय आहे.
IPL 2022, CSK vs KKR : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. सलामीच्या सामन्यात चेन्नईनं दिलेले 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने अवघ्या चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. उमेश यादवच्या भेदक गोलंदाजीनंतर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि नितेश राणा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईचा पराभव केला. एम.एस. धोनीने केलेली अर्धशतकी खेळी व्यर्थ गेली आहे. धोनीने 38 चेंडूत 50 धावांची खेळी केली होती. कोलकाता संघाने आयपीएलच्या 15 व्या हंगमाची दणक्यात सुरुवात केली आहे. आर्श्चयाची बाब म्हणजे, कोलकाता संघाचा वानखेडे स्टेडिअमवरील हा फक्त दुसरा विजय आहे.
तब्बल दहा वर्षानंतर कोलकाता संघाने वानखेडे स्टेडिअमवर विजय मिळवला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात कोलकाता संघाने वानखेडे स्टेडिअमवर विजय मिळवला. याआधी 2012 मध्ये कोलकाता संघ वानखेडे स्टेडिअमवर जिंकला होता. त्यानंतर वानखेडे स्टेडिअमवर कोलकाता संघाला कधीही जिंकता आलेलं नव्हतं. पण यंदा पहिल्याच सामन्यात कोलकाताने गतविजेत्या चेन्नईचा पराभव करत वानखेडेवरील पराभवाची मालिका खंडीत केली आहे.
वानखेडे मैदानावर कोलकाताची कामगिरी कशी आहे?
2008 मध्ये आयपीएलची सुरुवात झाली होती. तेव्हांपासून 2022 पर्यंत वानखेडे मैदानावर कोलकाता संघ 12 सामने खेळला आहे. यामधील फक्त दोन सामन्यात कोलकात्याला विजय मिळवता आला आहे. तर 10 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. वानखेडे मैदानावरील कोलकात्याची सर्वोच्च धावसंख्या 202 इतकी आहे. तर निचांकी धावसंख्या 67 इतकी आहे.
This is the first win for Kolkata Knight Riders at Wankhede after 10 long years.
— Johns. (@CricCrazyJohns) March 26, 2022
केकेआरचा विजयाचा श्रीगणेशा, चेन्नईचा सहा विकेटनं पराभव
सामन्यात केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे चेन्नईचे शिलेदार सर्वात आधी फलंदाजीला मैदानात उतरले. पण केकेआरच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून भेदक गोलंदाजी करत सामन्यात दबदबा राखला. अनुभवी उमेश यादवने पहिले दोन महत्त्वाचे विकेट घेत सामन्यात संघाला आघाडी मिळवून दिली. ऋतुराज शून्यावर, कॉन्वे 3 धावा करुन बाद झाल्यानंतर उथप्पा आणि रायडूने डाव काहीसा सावरला. पण उथप्पा 28 आणि रायडू 15 धावा करुन बाद झाले. दुबेही 3 धावा करुन तंबूत परतला. ज्यानंतर जाडेजा आणि धोनी यांनी संघाचा डाव सावरला. धोनीने 38 चेंडूत नाबाद 50 तर जाडेजाने 28 चेंडूत नाबाद 26 धावा झळकावत स्कोरबोर्डवर 131 धावा लावल्य़ा. ज्यामुळे केकेआरला विजयासाठी 132 धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाता संघाने सावध सुरुवात केली. रहाणे आणि वेंकटेश अय्यर यांनी संघाला सन्माजनक सुरुवात करुन दिली. रहाणेच्या 44 धावांच्या जोरावर कोलकाताने चेन्नईचा सहज पराभव केला. चेन्नईकडून ब्राव्होने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.