RR Tribute to Shane Warne : ऑस्ट्रेलियाचा महान फिरकीपटू ज्याच्या फिरकीनं अवघ्या क्रिकेट विश्वाला वेड लावलं होत त्या शेन वॉर्न(Shane Warne) यांचं 4 मार्च, 2022 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. ज्यानंतर सर्व क्रिकेट जगताने हळहळ व्यक्त केली होती. दरम्यान सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रिमीयर लीग (IPL 2022) या स्पर्धेसोबतही शेन यांचं खास नातं असून या स्पर्धेचं सर्वात पहिलं जेतेपद शेन यांच्या कर्णधारपदाखाली राजस्थान रॉयल्स (Rajsthan Royals) संघाने उंचावलं होतं. दरम्यान याचमुळे शेन यांना खास श्रद्धांजली देण्याचा निर्णय राजस्थान संघाने घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी मुंबई इंडियन्स (RR vs MI) विरद्धच्या 30 एप्रिल रोजीच्या सामन्यात हा श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडणार आहे. 


यावेळी राजस्थानचे खेळाडू S23 कॉलरवर लिहिलेली जर्सी घालणार असून नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील (DY Patil Stadium) मैदानात शेन वॉर्नच्या आठवणींची खास गॅलरी देखील तयार केली जाणार आहे. यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांना ही गॅलरी पाहता येणार आहे. विशेष म्हणजे शेन यांनी जिंकलेला पहिला-वहिला आयपीएलचा खिताब नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील मैदानातच जिंकला होता. त्याचठिकाणी त्यांना श्रद्धांजली दिली जाणार आहे.



शेन वॉर्न यांची कारकीर्द 


जगातील अव्वल दर्जाचा फिरकीपटू तसंच एक दिग्गज कर्णधार अशी शेन वॉर्न यांची ख्याती होती. ऑस्ट्रेलियाकडून अनेक वर्ष क्रिकेट खेळलेला वॉर्न क्रिकेट जगतात बहुतेक सर्वांना माहित आहे. वॉर्न यांनी 145 कसोटी सामन्यात 708 विकेट्स घेतल्या आहेत. तर 194 एकदिवसीय सामन्यात 293 गड्यांना माघारी धाडलं आहे. याशिवाय 55 आयपीएल सामन्यात वॉर्नने 57 विकेट मिळवल्या आहेत. मुरलीधरननंतर वॉर्न हा दुसरा गोलंदाज आहे ज्याने 708 विकेट घेतल्या आहेत. 2007 साली वॉर्ननं क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. वॉर्ननं क्रिकेटमधील प्रत्येक फॉर्मेटमध्ये आपली छाप सोडली आहे.  


हे देखील वाचा-