Virat Kohli in IPL : विराट कोहलीला जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजापैकी एक म्हणून ओळखलं जातं. विराट कोहलीची धावांचू भूक पाहून त्याला रनमशीनही म्हटले जाते. धावांचा पाठलाग करताना विराट कोहलीसारखा भरवशाचा फलंदाज दुसरा कुणीच नाही. पण मागील काही हंगामापासून विराट कोहलीची बॅट शांत आहे. यंदाच्या हंगामात तर विराट कोहलीला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. मंगळवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीला सलामीला पाठवण्यात आले, मात्र त्याला धावा जमवण्यात अपयश आलेच. नऊ धावा काढून विराट माघारी परतला. प्रत्येक दिग्गज खेळाडूंच्या कारकिर्दीत बॅडपॅच येतोच... क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि रिकी पाँटिंगही याला अपवाद नव्हते. फुटबॉलमध्ये क्रिस्टियानो रोनाल्डो आणि लियोनल मेसी, टेनिसमध्ये रोजर फेडरर आणि राफेल नडालपासून बॅडमिंटनमध्ये  सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांनाही याचा सामना करावा लागला. विराट कोहलीही याला अपवाद नाही. विराट कोहलीही सध्या आऊट ऑफ फार्म आहे.  


विराट कोहलीच्या बॅटमधून अखेरचं शतक 23 नोव्हेंबर 2019 रोजी आले होते. बांगलादेशविरोधात झालेल्या डे नाईट कसोटी सामन्यात कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर शतक झळकावले होते. त्यानंतर विराट कोहलीला शतक झळकावता आलेलं नाही. आयपीएलमध्ये 2016 चा अपवाद वगळता त्यानंतर प्रत्येक हंगामात विराट कोहलीची बॅट शांतच राहिली आहे. 2016 नंतर विराट कोहलीला कोणत्याही हंगामात 500 धावा करता आल्या नाहीत. मागील सहा वर्षातील विराटच्या कामगिरी पाहूयात... 


2016 : एका हंगामात चार शतक झळकावणारा विराट कोहली पहिला फलंदाज ठरला होता. हा विक्रम अद्याप कायम आहे. या हंगामात विराट कोहलीची सर्वोत्म धावसंख्या 113 होती. विराट कोहलीने 16 सामन्यात 973 धावा चोपल्या होत्या. विराट कोहलीच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबी फायनलमध्ये पोहचली होती. अंतिम सामन्यात हैदराबादने आरसीबीचा पराभव केला होता. 


2017 : दुखापतीमुळे पहिल्या चार सामन्याला विराट मुकला होता. या हंगामात विराट कोहलीने फक्त दहा सामने खेळले होते. दहा सामन्यात विराट कोहलीला 308 धावा काढता आल्या. यामध्ये चार अर्धशतकाचा समावेश होता.  


2018 : या  हंगामात विराट कोहलीने 14 सामन्यात 48 च्या सरासरीने 530 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने चार अर्धशतकं झळकावली होती. 


2019 : तीन वर्षानंतर विराट कोहलीच्या बॅटमधून आयपीएलमध्ये शतक आले होते. या हंगामात विराट कोहलीने 14 सामन्यात 464 धावा केल्या होत्या.  


2020: या हंगामात विराट कोहलीने 14 सामन्यात 466 धावा केल्या होत्या. तीन अर्धशतकं झळकावली होती.  


2021 : 14 व्या हंगामात विराट कोहलीने 15 सामन्यात 405 धवाा केल्या होत्या. विराट कोहलीच्या बॅटमधून तीन अर्धशतकं निघाली होती.  


2022 : सध्याच्या हंगामात विराट कोहलीची कामगिरी निराशाजनक सुरु आहे. आतापर्यंत विराट कोहलीला एकही अर्धशतक झळकावता आलेलं नाही. 48 धावांची सर्वोच्च खेळी आहे. हा अपवाद वगळता कोहलीला एकदाही 30 धावांचा पल्ला ओलांडता आला नाही. नऊ सामन्या विराट कोहलीने फक्त 128 धवाा केल्या आहे. यादरम्यान दोन वेळा शून्यावर बाद झालाय.