(Source: ECI/ABP News/ABP Majha)
RCB Vs KKR: रोमांचक सामन्यात आरसीबीचा विजय; वानिंदु हसरंगा, आकाश दीपची चमकदार कामगिरी
IPL 2022: अखेरच्या दोन षटकात हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकनं फटेकबाजी करच संघाला विजय मिळवून दिलाय.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील सहाव्या सामन्यात बंगळुरूनं कोलकात्याला 3 विकेट्सनं पराभूत केलंय. या सामन्यात आरसीबीच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. दरम्यान,आरसीबीच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत कोलकाताच्या संघाला 128 धावांवर रोखलं. त्यानंतर कोलकात्यानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक झाली. अखेरच्या दोन षटकात हर्षल पटेल आणि दिनेश कार्तिकनं फटेकबाजी करच संघाला विजय मिळवून दिलाय.
नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या कोलकात्याची संघाची खराब सुरुवात झाली. कोलकात्याचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य राहणेला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. अवघ्या 10 धावांवर असताना व्यंकटेश अय्यरनं आपली विकेट्स गमावली. त्यानंतर मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर अजिंक्य रहाणेही (9 धावा) बाद झाला. मात्र, त्यानंतर हसरंगानं त्याची जादू दाखवायला सुरुवात केली. त्याने श्रेयस अय्यरला अवघ्या 13 धावांवर माघारी धाडलं. त्यापाठोपाठ हसरंगानं लगेच जॅक्सनला बोल्ड केलं. त्यानंतर हसरंगानं पुन्हा एकदा आपली जादू दाखवत टीम साउथीनं अवघी एक धाव केलेली असताना त्याला बाद केलं. ज्यामुळं कोलकात्याच्या संघाला 20 षटकात सर्वबाद 128 धावापर्यंत मजल मारता आली. आरसीबीकडून वानिंदु हसरंगानं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. तर, आकाश दीपनं तीन विकेट्स प्राप्त केल्या. हर्षल पटेलनं दोन तर, मोहम्मद सिराजनं एक विकेट्स घेतली.
या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीच्या संघाची दमछाक होताना दिसली. आरसीबीचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (5 धावा) आणि अनूज रावत (0 धावा) स्वस्तात माघारी परतले. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहली आणि डेव्हिड व्हिलीलाही चांगली कामगिरी करता आली नाही. विराटनं 7 चेंडूत 12 धावा केल्या. तर, व्हिलीनं 28 चेंडूत 18 धावा केल्या. आरसीबीकडून सर्फेन रदरफोर्डनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. परंतु, टीम साऊथीनं 16 व्या षटकात त्याला बाद केलं. त्यानंतर मैदानात आलेला शाहबाज अहमद 27 धावा करून बाद झाला. आरसीबीनं सात विकेट्स गमावले असताना फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वानिंदु हसरंगालाही टीम साऊथीनं माघारी धाडलं. सामना कोलकात्याच्या बाजूला झुकलाय असं दिसत असताना दिनेश कार्तिक आणि हर्षल पटेलनं फटकेबाजी करत आरसीबीला विजय मिळवून दिला. कोलकात्याकडून टीम साऊथीनं सर्वाधिक तीन विकेट्स मिळवल्या. तर, उमेश यादवनं दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय, सुनिल नारायण आणि वरूण चक्रवर्ती यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.
हे देखील वाचा-
- Shoaib Akhtar On IPL Auction: पाकिस्तानच्या 'या' खेळाडूवर लागू शकते 20 कोटींची बोली, माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरचं वक्तव्य
- Pak Vs Pak: ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय मालिकेतून बाहेर
- RCB vs KKR : केकेआर आणि आरसीबी सामन्यासाठी सज्ज, 'या' 5 खेळाडूंवर असेल साऱ्यांची नजर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha