IPL 2021: बीसीसीआयकडून प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल होण्याची शक्यता
IPL 2021: आयपीएल सीझन 14 पूर्ण करण्यासाठी बीसीसीआयकडे फारच कमी वेळ आहे. मोठे नुकसान टाळण्यासाठी बीसीसीआय प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यात मोठे बदल करण्याची शक्यता आहे.
IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या सीझन 14 चा दुसरा टप्पा युएईमध्ये खेळला जाणार आहे. आयपीएल 14 पुन्हा 17 सप्टेंबरपासून सुरू होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप या स्पर्धेच्या तारखांची अधिकृत घोषणा केलेली नाही. वृत्तानुसार, बीसीसीआय जून अखेर आयपीएल 14 च्या दुसर्या भागाचे वेळापत्रक जाहीर करू शकते.
इनसाइड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार बीसीसीआय यावर्षीच्या प्लेऑफ आणि अंतिम सामन्यात बदल करण्याची तयारी करत आहे. यात प्लेऑफ व अंतिम सामना एकाच मैदानावर खेळवला जाणार असल्याची शक्यता आहे. प्ले ऑफ आणि अंतिम सामन्यासाठी दुबईला पसंती दिली जात आहे.
इंडियन प्रीमियर लीग सीझन 14 मध्ये आतापर्यंत 29 सामने खेळले गेले आहेत. यावर्षी एकूण 60 सामने खेळले जाणार आहेत आणि आता उर्वरित 31 सामने युएईच्या तीन मैदानांमध्ये दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे खेळले जातील. कोणत्या मैदानावर किती सामने खेळवण्यात येणार आहे, हे अद्याप ठरलेले नाही.
10 डबल हेडर खेळले जाणार?
आयपीएल 14 चा दुसरा भाग आयोजित करण्यासाठी बीसीसीआयकडे फक्त 20 ते 22 दिवसांची वेळ आहे. म्हणूनच बीसीसीआय 10 डबल हेडर सामने खेळवण्याचा विचार करीत आहे, तर उर्वरित 11 दिवस दररोज एक सामना आयोजित केला जाईल. या स्पर्धेचा अंतिम सामना 9 किंवा 10 ऑक्टोबरला खेळला जाऊ शकतो.
इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या मोसमाची सुरुवात 9 एप्रिलपासून झाली होती. आयपीएल 14 चा पहिला टप्पा मुंबई आणि चेन्नई येथे झाला होता. दिल्ली-अहमदाबादला स्थानांतरित होईपर्यंत ही स्पर्धा अतिशय यशस्वीरीत्या चालू होती. 1 मे रोजी बायो बबल ब्रेक झाला आणि एकाच वेळी अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. परिणामी बीसीसीआयला आयपीएल पुढे ढकलण्याचा निर्णय घ्यावा लागला.
बीपीसीआयने आधीच हे स्पष्ट केले होते की आयपीएल 14 रद्द झाल्यास त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते. गेल्या महिन्यात जनरल बोर्डाच्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएलला भारतातून युएईमध्ये हलविण्याची घोषणा केली होती.