IPL 2022 : उथप्पाने आरसीबीच्या गोलंदाजांना धू धू धुतलं, मोठा विक्रम केला नावावर
IPL 2022 : चेन्नईने आरसीबीचा पराभव करत आयपीएलमधील पहल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात 36 वर्षीय रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) षटकारांचा पाऊस पाडला.
Robin Uthappa Records : मंगळवारी झालेल्या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा पराभव करत आयपीएलमधील पहल्या विजयाची नोंद केली. या सामन्यात 36 वर्षीय रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) षटकारांचा पाऊस पाडला. उथप्पा-दुबेच्या वादळात आरसीबीच्या गोलंदाजांना पळती भुई थोडी झाली. रॉबिन उथप्पाने (Robin Uthappa) 50 चेंडूत 88 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत चौकारांपेक्षा षटकारांची संख्या दुप्पट होती. उथप्पाने चार चौकार आणि 9 षटकार लगावले. उथप्पाच्या खेळीच्या बळावर चेन्नई संघाला पहिला विजय नोंदवता आला.
उथप्पाने 9 षटकार लगावत नवीन विक्रम केला आहे. आयपीएल 2022 मध्ये आतापर्यंत एका डावात एखाद्या खेळाडूने लगावलेले सर्वाधिक षटकार आहे. याआधी हा विक्रम कोलकात्याच्या अंद्रे रसेलच्या नावावर होता. रसेलने पंजाबविरोधात एका डावात 8 षटकार लगावले होते. हा विक्रम उथप्पाने मोडला आहे. तर शिवम दुबेने रसेलच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. दुबेने आरसीबीविरोधात 8 षटकार लगावात वादळी खेळी केली. दुबेने 46 चेंडूत 95 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान दुबेने 8 षटकार आणि पाच चौकार लगावले. दरम्यान, शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पा यांच्यादरम्यान 165 धावांची भागिदारी झाली. पहिल्या दहा षटकात सीएसकेनं दोन गड्यांच्या मोबदल्यात 160 धावा केल्या होत्या. त्यानंतर दुबे आणि उथप्पा यांनी आरबीसीच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. निर्धारित 20 षटकांत सीएसकेने 217 धावा केल्या. अखेरच्या दहा षटकात सीएसकेनं 156 धावा चोपल्या.
हंगामातील सीएसकेचा पहिलाच विजय -
आयपीएलच्या 15 व्या हंगामातील सलग चार सामने गमावल्यानंतर चेन्नईनं पहिला विजय नोंदवला आहे. या सामन्यात बगंळुरूचा कर्णधार फाफ डू प्लेसिसनं (Faf du Plessis) नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात दोन विकेट्स गमावून 217 धावा केल्या. प्रत्युरात मैदानात उतरलेल्या बंगळुरूच्या संघाला 20 षटकात 9 विकेट्स गमावून 193 धावापर्यंत मजल मारता आली.