राजस्थानचा कोलकात्यावर सहा विकेट्सने विजय, संजू सॅमसन, ख्रिस मॉरिस विजयाचे शिल्पकार
कोलकाताने राजस्थानसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान राजस्थानने 18.5 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले.
KKR vs RR, IPL 2021 : मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरु असणाऱ्या 18 व्या आयपीएल सामन्यात राजस्थानने कोलकातावर 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. कोलकाताने राजस्थानसमोर 134 धावांचं आव्हान ठेवलं होतं. हे आव्हान राजस्थानने 18.5 षटकात 4 विकेट गमावून पूर्ण केले.
राजस्थानकडून कर्णधार संजू सॅमसनने सर्वाधिक (42) धावा केल्या. 134 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या जयस्वाल आणि जोस बटलरने सलामी दिली. शिवम दुबे आणि संजू सॅमसनने दमदार भागीदारी करत डाव सांभळला.
राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या कोलकाताची सुरुवात संथ झाली. कोलकाताची पहिल्या पावरप्लेमधील धावसंख्या अवघी 25 धावा एक बाद अशी होती. धावांसाठी स्ट्रगल करणाऱा शुभमन गिल सहाव्या षटकात 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या राहुल त्रिपाठी आणि नितीश राणाने कोलकाताचा डाव सावण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश राणाही आठव्या षटकात बाद झाला.
कोलकाताकडून राहुल त्रिपाठीने 26 चेंडूत 36 धावा केल्या. या खेळीत त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. दिनेश कार्तिकने 24 चेंडूत 25 धावा, नितीश राणाने 25 चेंडूत 22 धावा केल्या. कर्णधार इयॉन मॉर्गन शून्यावर रनआऊट झाला. तर तुफानी फटकेबाजीच्या ज्याच्याकडून अपेक्षा होती तो आंद्रे रसेन देखील 9 धावांवर बाद झाला.
राजस्थानकडून क्रिस मॉरिसने सर्वाधिक आणि महत्त्वाच्या चार विकेट घेतल्या. मॉरिसने दिनेश कार्तिक, आंद्रे रसेस, पॅट कमिन्स आणि शिवम मावीला तंबूत धाडलं. जयदेव उनादकट, चेतन सकरिया, मुस्तफिजूर रहमान यांनी प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.