(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोलकाताकडून पंजाबचा सात विकेट्सनी धुव्वा, कोलकाताचं प्ले ऑफच्या शर्यतीतील आव्हान कायम
शुभमन गिलनं 49 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 65 धावांची खेळी केली. तर ख्रिस लीननं अवघ्या २२ चेंडूत ४६ धावा फटकावल्या.
मोहाली : कोलकाता नाईट रायडर्सनं किंग्स इलेव्हन पंजाबचा सात विकेट्सनी धुव्वा उडवून प्ले ऑफच्या शर्यतीत आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. कोलकात्याच्या या विजयात सलामीच्या शुभमन गिलची नाबाद अर्धशतकी खेळी मोलाची ठरली.
या सामन्यात पंजाबनं कोलकात्यासमोर विजयासाठी 184 धावांचं आव्हान ठेवलं होतं. कोलकात्यानं हे आव्हान बारा चेंडू आणि सात विकेट्स राखून पार केलं. शुभमन गिलनं 49 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद 65 धावांची खेळी केली. तर ख्रिस लीननं अवघ्या 22 चेंडूत 46 धावा फटकावल्या. या विजयासह कोलकात्यानं बारा गुणांसह पाचवं स्थान गाठलं आहे. पंजाबकडून मोहम्मद शमी, अश्विन आणि अँड्र्यूने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.
त्याआधी सॅम करन आणि निकोलस पूरनच्या दमदार फलंदाजीमुळे किंग्स इलेव्हन पंजाबनं कोलकाता नाईट रायडर्ससमोर 184 धावांचं आव्हान ठेवलं होते. सलामीचे लोकेश राहुल आणि ख्रिस गेल लवकर माघारी परल्यानंतर निकोलस पूरन आणि मयांक अगरवालनं पंजाबचा डाव सावरला. त्या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागीदारी रचली.
पूरननं 48 तर मयांकनं 36 धावांचं योगदान दिलं. त्यानंतर सॅम करननं 24 चेंडूत 55 धावा फटकावल्या. कोलकाताकडून संदीप वॉरिअरने 2, हॅरी गर्नी, आंद्रे रसेल आणि नितीश राणाने प्रत्येकी एक-एक विकेट घेतली.