एक्स्प्लोर
Advertisement
मायदेशात यजमानांची 'कसोटी'; भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी किवी संघाची घोषणा
भारत आणि न्यूझीलंड संघांमधली पहिली कसोटी शुक्रवारपासून सुरु होत आहे. न्यूझीलंडने दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी एजाझ पटेल या एकमेव फिरकी गोलंदाजाचा तेरा सदस्यीय संघात समावेश केला आहे.
वेलिंग्टन : भारत आणि न्यूझीलंड संघांमधली पहिली कसोटी शुक्रवारपासून वेलिंग्टनमध्ये खेळवली जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी न्यूझीलंडनं आपला 13 सदस्यीय संघ घोषित केला आहे. केन विल्यम्सनच्या नेतृत्वाखालील या संघात कायल जेमिन्सन या डोमेस्टिक क्रिकेट गाजवणाऱ्या वेगवान गोलंदाजाला संघात स्थान देण्यात आलं आहे.
एजाझ पटेल एकमेव फिरकी गोलंदाज
न्यूझीलंडनं दोन कसोटी सामन्यांच्या या मालिकेसाठी एजाझ पटेल या एकमेव फिरकी गोलंदाजाचा तेरा सदस्यीय संघात समावेश केला आहे. एजाझ पटेल हा डावखुरा फिरकी गोलंदाज आहे. त्यानं आजवरच्या कारकीर्दीत सात कसोटी आणि दोन ट्वेन्टी ट्वेन्टी सामन्यांत न्यूझीलंडचं प्रतिनिधित्व केलं आहे. एजाझ पटेलच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 22 आणि ट्वेन्टी ट्वेन्टीत एक विकेट आहे. त्यानं पदार्पणात 124 धावांत सात विकेट्स घेऊन न्यूझीलंडला पाकिस्तानविरुद्धची अबुधाबी कसोटी जिंकून दिली होती. या कसोटीच्या दुसऱ्या डावात एजाझ पटेलनं 59 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं होतं.
भारताविरुद्ध यजमानांची बाजू वरचढ
भारताच्या न्यूझीलंड दौऱ्यातल्या ट्वेन्टी ट्वेन्टी मालिकेत विराटसेनेनं 5-0 असं निर्विवाद वर्चस्व गाजवलं. पण त्यानंतर वन डे मालिकेत भारताला 31 वर्षांनंतर व्हाईटवॉश देऊन किवींनी ट्वेन्टी ट्वेन्टीतल्या पराभवाची परतफेड केली. यंदाच्या मालिकेत दोन्ही संघात चुरस असली तरी न्यूझीलंडच्या भूमीवर भारताचा आजवरचा कसोटी इतिहास निराशाजनक राहिला आहे.
1968 पासून आजवर भारतानं न्यूझीलंडमध्ये 9 कसोटी मालिका खेळल्या आहेत. या नऊपैकी केवळ दोन मालिकाच भारताला जिंकता आल्या आहेत. पण पाच मालिकांमध्ये भारताला यजमानांकडून हार स्वीकारावी लागली. तर दोन मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. 1968 साली टायगर पतौडी आणि 2009 साली महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं न्यूझीलंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता.
कसोटी अजिंक्यपदाच्या शर्यतीत भारत आघाडीवर
आयसीसी कसोटी अजिंक्यपदाच्या गुणतालिकेत टीम इंडियानं मागील सातही कसोटी सामने जिंकून 360 गुणांची कमाई केली आहे. या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ केवळ एक कसोटी जिंकून 60 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. भारतानं न्यूझीलंडविरुद्धची मालिका 2-0 अशा फरकानं जिंकल्यास कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम फेरीतलं स्थान जवळपास निश्चित होईल.
न्यूझीलंडचा कसोटी संघ
केन विल्यमसन (कर्णधार), टॉम लॅथम, टॉम ब्लंडेल, रॉस टेलर, हेन्री निकोलस, बी. जे. वॅटलिंग, कॉलीन डी ग्रँडहोम, टीम साऊथी, नील वॅगनर, ट्रेन्ट बोल्ट, एजाझ पटेल, कायल जेमिसन, डॅरियल मिचेल
भारताचा कसोटी संघ
विराट कोहली (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, शुभमन गिल, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, रिद्धिमान साहा, रविंद्र जाडेजा, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी, हनुमा विहारी, जसप्रीत बुमरा, नवदीप सैनी, रिषभ पंत, ईशांत शर्मा
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
फॅक्ट चेक
Advertisement