(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India Vs Pakistan World cup 2023 : पाकिस्तानची भले मागील सामन्यात रेकाॅर्ड ब्रेक कामगिरी पण हे 5 विक्रम स्वप्नातही मोडू शकत नाही!
India Vs Pakistan World cup 2023 : आजघडीला भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे राजकीय आणि राजनैतिक संबंध खराब आहेत. त्यांनी जानेवारी 2012 पासून एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही.
India Vs Pakistan World cup 2023 : क्रिकेट महाकुंभ मेळ्यातील सर्वांत मोठा महामुकाबला भारत विरुद्ध पाकिस्तान उद्या (14 ऑक्टोबर) जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर म्हणजेच अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. दोन्ही संघांनी विजयी सलामी देत पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यातही मागील सामन्यात पाकिस्तानने वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत उद्या भारताशी दोन हात करणार आहे. दुसरीकडे, या महामुकाबल्यात टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे. आजघडीला भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांचे राजकीय आणि राजनैतिक संबंध खराब आहेत. त्यांनी जानेवारी 2012 पासून एकही द्विपक्षीय मालिका खेळलेली नाही. त्यामुळे दोन्ही देशांचे खेळाडू केवळ आशिया कप किंवा आयसीसी स्पर्धांमध्येच मैदानावर भिडताना दिसतात.
हेड-टू-हेड सामन्यांचा विचार केल्यास पाकिस्तानने एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारताविरुद्ध अधिक सामने जिंकले आहेत. तर T20 फॉरमॅटमध्ये भारताचा वरचष्मा राहिला आहे. क्रिकेटच्या इतिहासात दोन्ही संघांच्या खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. त्यामुळे अशा काही विक्रमांबद्दल जाणून घेऊया जे पाकिस्तानला तोडणे खूप कठीण आहे.
वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध सलग विजय
पाकिस्तानविरुद्धच्या वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा दबदबा सर्वश्रुत आहे. सध्या, T20 आणि एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारताचा पाकिस्तानविरुद्ध 13-1 (सुपर ओव्हरमधील विजयासह) विक्रम आहे. 2021 च्या टी-20 विश्वचषकात 10 विकेट्सने विजय मिळवून पाकिस्तानने भारताचा सलग 12 विजयांचा सिलसिला खंडित केला असेल. परंतु, यासाठी त्यांना 29 वर्षांचा दीर्घकाळ वाट पाहावी लागली. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला अद्याप भारताला पराभूत करता आलेले नाही.
आयसीसी एकदिवसीय नॉकआउट्समध्ये वर्चस्व
आयसीसी नॉकआऊट सामन्यांच्या बाबतीत भारत हा सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. 2011 च्या वर्ल्डकपपासून भारत प्रत्येक आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या बाद फेरीत पोहोचला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ICC ODI फॉरमॅटमध्ये 26 बाद सामने खेळले आहेत, जे पाकिस्तानपेक्षा 8 जास्त आहेत.
घरच्या मैदानावर कसोटीत विजय
भारताने आतापर्यंत आपल्या भूमीवर 114 कसोटी सामने जिंकले आहेत, जे कोणत्याही आशियाई संघासाठी सर्वाधिक आहे. पाकिस्तान संघाबद्दल बोलायचे झाले तर, त्याने मायदेशात 60 कसोटी जिंकल्या आहेत. 2012-11 च्या मोसमात इंग्लंडविरुद्ध 1-2 अशा पराभवानंतर टीम इंडियाने घरच्या मैदानावर एकही कसोटी मालिका गमावलेली नाही.
T20 मध्ये 200+ चा सर्वोच्च स्कोअर
टीम इंडिया हा असा संघ आहे ज्याने आंतरराष्ट्रीय T20 मध्ये सर्वाधिक 200 किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत. भारताने 27 वेळा 200 धावांचा टप्पा गाठला आहे, तर पाकिस्तानी संघ केवळ 11 वेळा हा टप्पा पार करू शकला आहे. पाकिस्तानला भारताच्या संख्येच्या जवळपास येणे जवळपास अशक्य आहे. ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि इंग्लंडही या बाबतीत पाकिस्तानच्या पुढे आहेत.
ऑस्ट्रेलियात सलग दोन कसोटी मालिका जिंकल्या
ऑस्ट्रेलियाला त्याच्या भूमीवर कसोटी मालिकेत पराभूत करणारा टीम इंडिया हा एकमेव आशियाई संघ आहे. भारताने हा पराक्रम सलग दोनदा केला आहे. सर्वप्रथम, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने 2018-19 मध्ये मालिका जिंकली होती. त्यानंतर विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे ब्रिगेडने 2020-21 मध्ये कसोटी मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली. पाकिस्तानबद्दल बोलायचे झाले तर ते ऑस्ट्रेलियात एकदाही कसोटी मालिका जिंकू शकलेले नाही.
भारत-पाकिस्तान (H2H)
- कसोटी : 59, पाकिस्तान 12, भारत 9, ड्रॉ 38
- एकदिवसीय : 134, पाकिस्तान विजयी 73, भारत विजयी 56, निकाल नाही 5
- T20 आंतरराष्ट्रीय : 12, भारत 9, पाकिस्तान 3
इतर महत्वाच्या बातम्या