IND vs PAK Ahmedabad Weather: भारत-पाक यांच्यामध्ये अहमदाबादमध्ये महामुकाबला, हवामान अन् खेळपट्टी बद्दल जाणून घ्या
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर महामुकाबला रंगणार आहे.
World Cup 2023 IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शनिवारी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर (Narendra Modi Stadium) महामुकाबला रंगणार आहे. विश्वचषकातील सर्वात रोमांचक सामन्याची (IND vs PAK) सर्वांनाच प्रतिक्षा आहे. सामन्यावेळी पावसाची शक्यता नाही. त्याशिवाय तापमानही सर्वसाधारण राहील.अहमदाबाद येथे शनिवारी जास्तीत जास्त 35 डिग्री तापमान राहण्याची शक्यता आहे. कमीत कमी 21 डिग्री इतके तापमान असू शकते. त्यामुळे शनिवारी अहमदाबादमध्ये जास्त ऊन्हाची शक्यता नाही.
भारत-पाकिस्तान सामन्याची खेळपट्टी कशी आहे ?
अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर धावांचा पाऊस पडू शकतो. फलंदाजांची येथे चांदीच होणार आहे. फलंदाजीला पोषक असणाऱ्या या खेळपट्टीवर धावांचा पाऊस पडणार आहे. गोलंदाजांनाही येथे थोडीफार मदत मिळण्याची शक्यता आहे. सामना पुढे जसा जाईल तशी फिरकी गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता जास्त आहे. मोठे मैदान असल्यामुळे गोलंदाज न घाबरता चेंडू टाकू शकतील.
मैदानावर आतापर्यंत किती सामने ?
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर आतापर्यंत 29 वनडे सामने झाले आहेत. त्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 16 वेळा विजय मिळवला आहे. तर दुसऱ्यांदा फलंदाजी करणारा संघ 13 वेळा विजयी झाला आहे. नाणेफेक जिंकणारा संघ येथे प्रथम फलंदाजी घेऊ शकतो. नरेंद्र मोदी स्टेडिअमवरील पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 237 इतकी आहे. तर दुसऱ्या डावातील सरासरी धावसंख्या 206 आहे.
विश्वचषकात भारतच भारी -
वनडे इतिहासात पाकिस्तान संघाचे पारडे जड असले तरी विश्वचषकात भारतच वरचढ राहिला आहे. आतापर्यंत या दोन्ही संघामध्ये सातवेळा सामना झाला आहे. या सर्व 7 सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तानला विश्वचषकातील एकही सामना जिंकता आला नाही. 2023 च्या विश्वचषकात पाकिस्तानचा पराभव करत भारत आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. तर पाकिस्तान विश्वचषकातील पराभवाचा सिलसिला तोडण्यासाठी मैदानात उतरेल.
वनडे विश्वचषकात भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ -
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.