एक्स्प्लोर
बांगलादेशची भारतीय भूमीवर पहिलीच कसोटी

हैदराबाद: विराट कोहलीची टीम इंडिया आणि मुशफिकर रहिमचा बांगलादेश संघ यांच्यामधल्या एकमेव कसोटी सामन्याला गुरुवारपासून हैद्राबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सुरुवात होत आहे.
बांगलादेशच्या दृष्टीनं ही कसोटी ऐतिहासिक ठरणार आहे. कारण बांगलादेशचा भारतीय भूमीवरचा हा पहिलाच कसोटी सामना आहे.
आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडिया 'नंबर वन'वर आहे, तर बांगलादेश चक्क नवव्या स्थानावर आहे. त्यामुळं उभय संघांमधल्या या सामन्याकडे असमान ताकदीच्या फौजांमधली लढाई म्हणून पाहिलं जात आहे.
बांगलादेशनं वन डे क्रिकेटमध्ये धक्कादायक निकाल देणारा संघ अशी ख्याती मिळवली असली, तरी कसोटी क्रिकेटमध्ये मात्र सोळा वर्षांनंतरही बांगलादेशच्या क्षमतेविषयी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
यंदाच्या मोसमात न्यूझीलंड आणि इंग्लंड या संघांविरुद्ध बांगलादेशला चारपैकी तीन कसोटी सामने गमावण्याची वेळ आली आहे. त्यामुळं हैदराबादच्या कसोटी सामन्यात भारताचं पारडं जड मानलं जात आहे.
बांगलादेशची भारतीय भूमीवर पहिलीच कसोटी
हैद्राबादमध्ये उद्यापासून सुरू होणारी एकमेव कसोटी ही बांगलादेशची भारतीय भूमीवरची पहिली कसोटी आहे. त्यामुळं ही कसोटी बांगलादेशसाठी ऐतिहासिक आहेच, पण टीम इंडियासाठीही ही कसोटी वेगळ्या अर्थानं ऐतिहासिक ठरणार आहे. आणि त्याचं कारण आहे ती करुण नायरऐवजी अजिंक्य रहाणेची अंतिम अकराजणांत निवड होण्याची शक्यता.
करुण नायरनं इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या कसोटीत नाबाद त्रिशतक ठोकलं होतं. त्यानंतर 50 दिवसांनी बांगलादेशविरुद्ध होत असलेल्या पुढच्याच कसोटीत करुण नायरला वगळून अजिंक्य रहाणेला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीनंच या बदलाचे संकेत दिले आहेत.
करुण नायरच्या इंग्लंडविरुद्धच्या त्रिशतकाचं कौतुक आहेच, असं सांगून तो म्हणाला की, त्या एका पराक्रमानं अजिंक्य रहाणेची गेल्या दोन वर्षांमधली मेहनत आणि त्याचं सातत्य झाकोळता येणार नाही. अजिंक्यची कसोटी क्रिकेटमधली सरासरी ही 47.33 आहे. त्याच्यासारखा फलंदाज कोणत्याही कसोटी संघात सहज स्थान मिळवेल.
त्रिशतकवीराला वगळलं
इंग्लंडविरुद्धच्या आधीच्या कसोटीत त्रिशतक ठोकूनही, बांगलादेशविरुद्धच्या पुढच्याच कसोटीत करुण नायरला वगळण्यात आलं तर ती त्या पद्धतीची कसोटी क्रिकेटच्या इतिहासातली दुसरी घटना ठरेल.
याआधी 1925 साली इंग्लंडनं आपला त्रिशतकवीर अँडी सँडहॅमला पुढच्याच कसोटीतून वगळण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी अँडी सँडहॅमनं वेस्ट इंडिज दौऱ्यातल्या किंगस्टन कसोटीत 325 धावांची खेळी केली होती. कसोटी क्रिकेटमधलं ते पहिलंच त्रिशतक होतं. पण त्या वेळी अँडी सँडहॅम वयाच्या चाळीशीत होते. त्यामुळं इंग्लंडनं त्यांना कसोटी क्रिकेटमध्ये पुन्हा कधीही संधी दिली नाही.
https://twitter.com/BCCI/status/829226013427105794
https://twitter.com/BCCI/status/829227182325190658
आणखी वाचा























