(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind Vs SL, 1 ODI : भारताचा श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय, शिखर धवन विजयाचा शिल्पकार
श्रीलंकेने भारतासमोर 262 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.
IND vs SL 1st ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या वन डे मालिकेचा पहिला सामना खेळवण्यात आला. भारताने श्रीलंकेवर सात विकेट्सने विजय मिळवला आहे. श्रीलंकेने भारतासमोर 262 धावांचे आव्हान समोर ठेवले होते. हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले.
भारताचा कर्णधार शिखर धवनने 95 बॉलमध्ये नाबाद 86 धावांची खेळी करत संघाचा विजय सोपा केला. इशान किशन 59 आणि पृथ्वी शॉ ने 43 धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने नाबाद 31 धावा केल्या. भारताने हा सामना जिंकत मालिकेत 1-0 ने आघाडी मिळवली आहे.
धवनच्या सहा हजार धावा पूर्ण
धवनने 86 धावांची खेळी करता सहा चौकार आणि एक षटकार लगावला. या बरोबरच धवनने वन डे क्रिकेटमध्ये 6000 धावा पूर्ण करण्याचा टप्पा पार केला. धवनने 6000 धावाचा टप्पा गाठताना धवनने वेस्ट इंडिजचे सर विवियन रिचर्ड आणि इंग्लंडचा कर्णधार जो रुट यांना मागे टाकले आहे.
धवनने 140 सामने खेळत 6 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तर रिचर्डसन आणि रुटला धावा ६ हजार धावा पूर्ण करण्यासाठी 141 सामने खेळावे लागले होते. सर्वात जलद सहा हजार धावा पूर्ण करण्याचे रेकॉर्ड दक्षिण आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर आहे. आमलाने फक्त 123 सामन्यातच हा विक्रम केला आहे. आमलानंतर दुसऱ्या क्रमांकावर भारताचा कर्णधाप विराट कोहलीचा (136 सामने) क्रमांक लागतो. आणि तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन (139 सामने) आहे.
श्रीलंकेने टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेन 50 षटकात 262 धावा केल्या. पृथ्वी शॉ (43 रन, 24 बॉल, 9 चौकार), शिखर धवन (नाबाद 86 रन, 95 बॉल, 6 चौकार, 1 षटकार), ईशान किशन (59 रन, 42 बॉल, 8 चौकार, 2 षटकार), मनीष पांडे (25 रन, 40 बॉल, 1 चौकार, 1 षटकार) आणि सूर्यकुमार यादव (नाबाद 31 रन, 20 बॉल, 5 चौकार) जोरावर हे आव्हान भारताने 36. 4 षटकात 3 विकेट गमावून पूर्ण केले. श्रीलंकेकडून धनंजय सिल्वाने दोन गडी बाद केले. तर भारताकडून दीपक चहर, कुलदीप यादव आणि चहल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. दुसरी वन डे 20 जुलैला खेळवण्यात येणार आहे.