IND vs NZ Last Match in Wankhede : वानखेडे मैदानात न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा सामना कधी झाला होता? छातीत कळ येणारा निकाल!
वानखेडे मैदानावर टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघ यांच्यात एकदिवसीय सामना झाला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असं आहे.
IND vs NZ Last Match in Wankhede : विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीचा सामना उद्या बुधवारी (15 नोव्हेंबर) टीम इंडियाचा सामना मुंबईच्या ऐतिहासिक मैदान वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडशी होत आहे. या मैदानात भारतीय संघाच्या खास आठवणी आहेत. याच मैदानावर टीम इंडियाने 2011 च्या एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना श्रीलंकेविरुद्ध जिंकला होता. मात्र, याच मैदानावर 2016 च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाला वेस्ट इंडिजकने पराभत करत वर्ल्ड कपमधून बाहेर फेकले होते. त्यामुळे या मैदानावर टीम इंडियाने मोठे सामने जिंकले आणि हरले सुद्धा आहेत.
Wankhede Stadium ahead of the Semi Finals clash between India and New Zealand.pic.twitter.com/wJwzdaArZM
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 14, 2023
आता याच मैदानावर टीम इंडियाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. अशा परिस्थितीत अनेक क्रिकेट चाहत्यांच्या मनात प्रश्न आहे की या मैदानावर भारत आणि न्यूझीलंड संघ यांच्यात एकदिवसीय सामना झाला आहे का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असं आहे.
वानखेडेवर शेवटचा भारत-न्यूझीलंड सामना कधी झाला?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर फक्त एकच एकदिवसीय सामना खेळला गेला, जो 2017 मध्ये तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होता. तो सामना देखील विराट कोहलीचा 200 वा एकदिवसीय सामना होता आणि त्या सामन्यात कर्णधार कोहलीने 31 वे वनडे शतकही झळकावले. त्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण न्यूझीलंडचा सलामीवीर गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्या 6 षटकात भारतीय सलामीवीर शिखर धवन (9) आणि रोहित शर्मा (20) यांना बाद केले. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कर्णधार कोहलीने कमान सांभाळली, मात्र चौथ्या क्रमांकावर आलेला केदार जाधव 25 चेंडूत 12 धावा करून बाद झाला आणि टीम इंडियाने 71 धावांवर तिसरी विकेट गमावली. त्यानंतर दिनेश कार्तिक फलंदाजीला आला आणि त्याने कोहलीसोबत 73 धावांची भागीदारी केली.
कार्तिक 37 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला आणि त्यानंतर महेंद्रसिंग धोनी ६व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. धोनी (25), हार्दिक पांड्या (16), भुवनेश्वर कुमार (26) यांनी कोहलीला काही प्रमाणात साथ दिली. विराट कोहली हा एकमेव खेळाडू होता ज्याने 125 चेंडूत 121 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला 50 षटकात 8 विकेट गमावून 280 धावांपर्यंत मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करत न्यूझीलंड संघाने 49 षटकांत 4 गडी गमावून 284 धावा केल्या आणि सामना 6 विकेटने जिंकला. न्यूझीलंडकडून टॉम लॅथमने नाबाद 103 धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय माजी फलंदाज रॉस टेलरनेही 95 धावांची उत्कृष्ट खेळी खेळली. या दोन मोठ्या खेळीमुळे न्यूझीलंडने तो सामना जिंकला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वानखेडेवरील हा एकमेव एकदिवसीय सामना होता, जो सुमारे 6 वर्षांपूर्वी झाला होता. या सामन्यात न्यूझीलंडसाठी ट्रेंट बोल्ट (4 विकेट), टिम साऊदी (3 विकेट), मिचेल सँटनर (1 विकेट), आणि टॉम लॅथम (नाबाद 103 धावा) ही सर्वोत्तम कामगिरी करण्यात आली. हे चार खेळाडू भारत विरुद्ध विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या सामन्यातही खेळणार आहेत. अशा स्थितीत टीम इंडियासाठी ही नक्कीच मोठी धोक्याची घंटा आहे.
इतर महत्वाच्या बातम्या