IND Vs ENG: इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटीत अश्विन खेळणार, Playing 11 मध्ये 'या' खेळाडूची जागा घेणार
IND Vs ENG: इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे. आर अश्विन हेडिंग्ले टेस्टमध्ये खेळणार आहे.
IND Vs ENG: इंडिया आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 25 ऑगस्टपासून हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे. लॉर्ड्स कसोटीत जिंकल्यानंतरही टीम तिसऱ्या कसोटीत प्लेईंग 11 मध्ये बदल करणार आहे. माहिती अशी मिळाली आहे की, जगातील नंबर एकचा स्पिनर आर अश्विन हेडिंग्ले टेस्टमध्ये खेळणार आहे. आर अश्विनला आतापर्यंत इंग्लंड दौऱ्यात संधी मिळालेली नाही. आता तिसऱ्या कसोटीत त्याला रविंद्र जाडेजाच्या जागी संधी मिळणार असल्याची माहिती आहे.
रवींद्र जाडेजानं फलंदाजी तर चांगली केली आहे मात्र गोलंदाजीमध्ये तो अपयशी ठरला आहे. त्यानं पहिल्या कसोटीत अर्धशतक केलं होतं तर दुसऱ्या कसोटीत देखील 40 धावांची खेळी केली होती. मात्र त्याला दोन कसोटींमधील चार डावात एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळं अष्टपैलू असलेल्या अश्विनला संधी मिळणार असल्याचं निश्चित झालं आहे.
चार वेगवान गोलंदाजांसह उतरणार टीम इंडिया
लॉर्ड्स टेस्टमध्ये टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह उतरली होती. या कसोटीत या चार वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली. 20 पैकी 19 विकेट्स या चौघांनी घेतल्या होत्या. त्यामुळं हेडिंग्ले टेस्टमध्ये देखील टीम इंडिया मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि ईशांत शर्मा या चौघांना संधी देणार आहे.
तिसरा कसोटीसाठी इंग्लंडचा संघ जाहीर
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना 25 ऑगस्टपासून सुरु होणार आहे. या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडनं आपला संघ जाहीर केला आहे. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाल्यानंतर इंग्लंड संघानं जॅक क्रॉली आणि डॉम सिबली यांना संघात स्थान दिलेलं नाही. याशिवाय फलंदाज डेव्हिड मलानला तीन वर्षांनंतर कसोटी संघात स्थान मिळालं आहे. त्यानं शेवटचा कसोटी सामना ऑगस्ट 2018 मध्ये एजबॅस्टन येथे खेळला. याशिवाय तिसऱ्या कसोटी समान्यासाठी या संघात वेगवान गोलंदाज साकिब महमूदचाही सहभाग असेल. साकिब प्रथमच भारताविरुद्ध या संघातून कसोटी सामन्यात प्रवेश करणार आहे.
इंगलंडच्या टीममधील बरेच क्रिकेटपटू पहिल्या आणि दुसऱ्या कसोटी सामन्यात दुखापतग्रस्त झाले. पहिल्या सामन्यात मार्क वूड याला दुखापत झाल्यानं त्याला संघातून वगळण्यात आलं होतं. एमराल्ड हेडिंग्ले या मैदानावर खेळवण्यात येणाऱ्या सामन्यापूर्वी पूर्णपणे ठीक होतील, अशी अपेक्षा आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड म्हणाले की, "कसोटी सामना खेळण्यासाठी आमचा संघ पूर्णपणे तयार आहे आणि पुढील आठवड्यात एमराल्ड हेडिंग्लेमध्ये मैदानात परतण्याचं आमचं लक्ष्य आहे." पुढे बोलताना ते म्हणाले की, "आशा आहे की, पहिल्या कसोटीत मार्क वुड त्याच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्यानंतर ठीक होऊन सामान्य खेळण्यासाठी तयार होतील."
तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडच्या संघाची घोषणा
जो रूट (कर्णधार) , मोईन अली, जेम्स अँडरसन, जॉनी बेअरस्टो, रोरी बर्न्स, जोस बटलर, सॅम करन, हसीब हमीद, डॅन लॉरेन्स, साकिब महमूद, डेव्हिड मलान, क्रॅग ओव्हरटन, ओली पोप, ओली रॉबिन्सन, मार्क वुड यांची निवड करण्यात आली आहे.
भारतीय संघाची कसोटी मालिकेत 1-0 नं आघाडी
टीम इंडियानं दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा 151 धावांनी पराभव केला. पुढील कसोटी सामने जिंकून आपली पकड मजबूत करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहोम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांनी दुसऱ्या कसोटी सामन्यात धडाकेबाज खेळी केली होती.