Women Asia Cup : भारतीय महिला हॉकी संघाने मागील वर्षी टोक्यो ऑलिम्पिकमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती. ही कामगिरी कायम ठेवत महिला संघाने आता महिला आशिया हॉकी स्पर्धेत कांस्य पदक खिशात घातलं आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने चीन 2-0 ने मात देत विजय मिळवला आहे. सेमीफायनलमध्ये कोरियाकडून पराभूत झाल्यानंतर भारताने तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात मात्र विजय मिळवला आहे.



असा पार पडला सामना


भारतीय महिला हॉकी खेळाडूंनी सुरुवातीपासूनच उत्तम खेळ दाखवला होता. सुरुवातीला भारताने दोन पेनल्टी कॉर्नर मिळवले. ज्यातील एका कॉर्नवर शर्मिला देवीने 13 ल्या मिनिटाला गोल करत भारताला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. ज्यानंतर भारताने सतत आक्रमणं सुरुच ठेवली. ज्यानंतर 19 व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने भारताच्या गुरजीतने शानदार गोल करत भारताची आघाडी 2-0 अशी केली. ज्यानंतर उर्वरीत काम कर्णधार असणाऱ्या गोलकिपर सविता पुनियाने केलं.


सविताने चीनची आक्रमणं शिताफिने परतवून लावली. चीनला मिळालेल्या एका पेनल्टी कॉर्नरवर चीनने उत्तम प्रयत्न केला होता. पण सविताने हा प्रयत्न नाकाम करत शानदार सेव्ह केला. दुसऱ्या हाल्फमध्येतर चीनने अधिक प्रयत्न करत अनेक गोल करण्याच्या संधी मिळवल्या पण सविताने खंबीर कामगिरी करत एकही गोल होऊ दिला नाही. ज्यामुळे अखेर सामना भारताने 2-0 च्या फरकाने जिंकत कांस्य पदकावर नाव कोरलं. सामन्यातील अप्रतिम खेळीमुळे शर्मिला देवी हिचा प्लेयर ऑफ द मॅच म्हणून सन्मान करण्यात आला.



भारताची आशिया कपमधील कामगिरी


स्पर्धेच्या पहिल्याच सामन्याक भारताने मलेशियाला 9-0 ने मात दिली. पण त्यानंतर भारताला जपानकडून 0-2 ने पराभव पत्करावा लागला. पण पुढच्याच सामन्यात भारताने सिंगापुरवर 9-1 दांडगा विजय मिळवत सेमीफायनलमध्ये जागा मिळवली. पण तिथे कोरियाने 2-3 ने नमवल्याने भारत फायनलमध्ये जाऊ शकला नाही. पण तिसऱ्या स्थानासाठीच्या सामन्यात मात्र भारताने चीनला 2-0 ने मात देत कांस्य पदक जिंकलं आहे.


हे देखील वाचा-



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha