Uttar Pradesh Assembly Election 2022: विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने पाच राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजप आणि समाजवादी पार्टी यांनी जोरदार प्रचाराला सुरूवात केली आहे. आज समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव आणि आरएलडी अध्यक्ष जयंत चौधरी यांनी मुजफ्फरनगर येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी अखिलेश यादव यांनी शेतकरी नेते राकेश टिकैत यांच्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. राकेश टिकैत यांना मी समजावणार आहे, ते आमच्या रथात बसतील असा विश्वास अखिलेश यादव यांनी व्यक्त केला आहे.
भाजपने आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी यांना सोबत येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, आरएलडीच्या अध्यक्षांनी ही ऑफर फेटाळली. त्यानंतर त्यांनी अखिलेश यादव यांच्याबरोबर पत्रकार परिषद घेतली. अखिलेश यादव म्हणाले की, भाजप आणि अमित शहांचे निमंत्रण कोण स्वीकारत आहे? आज जयंत चौधरी आणि मी वारसा पुढे नेत आहोत. ही निवडणूक चौधरी चरणसिंग यांचा वारसा पुढे नेण्यासाठी आहे. त्यांना शेतकरी समृद्ध बनवायचा होता. भाजपने आपला ठराव वाचावा, त्यामध्ये दिलेली आश्वासन पूर्ण केली आहेत का? यावेळी ऐतिहासिक विजय होणार आहे. आरएलडी आणि सपा मिळून भाजपचा पराभव करणार आहेत. आम्ही दोघेही शेतकऱ्यांचे पुत्र आहोत. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी शेवटपर्यंत लढणार असल्याचे अखिलेश यावेळी म्हणाले.
शेतकऱ्यांच्या मतांचा आदर न करता केंद्र सरकारने तीन कायदे आणले होते. शेतकऱ्यांनी एकजुटीने सरकारला कायदा मागे घेण्यास भाग पाडले. निवडणुकीसाठी केंद्र सरकारने हे तीन कायदे मागे घेतले आहेत. मी शेतकऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की यूपीमध्ये असा कोणताही कायदा लागू केला जाणार नाही. वीज 300 युनिट मोफत असेल आणि एमएसपीच्या खरेदीसाठी सरकारी व्यवस्था करावी लागेल, आम्ही ते करू असे आश्वासन यावेळी अखिलेश यादव यांनी दिले.
पाच राज्यांच्या निवडणुकींच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये भारतीय किसान युनिय कोणाला पाठिंबा देणार याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत भारतीय किसान युनियन समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देणार असल्याचे बोलले जात होते. याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय किसान संघटनेचे (BKU) प्रमुख नरेश टिकैत यांनी समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय लोक दल यांच्या युतीला समर्थन देण्याचा निर्णयही देखील घेतला होता. मात्र, त्यांच्या या निर्णयाचा त्यांचे बंधू राकेश टिकैत यांनी इन्कार करत विधानसभा निवडणुकीत आम्ही कोणत्याही पक्षाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका टिकैत यांनी मांडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या: