South Africa vs Australia : चारशे पाचशेचा डोंगर रचणारे दक्षिण आफ्रिकन कागदी वाघ पुन्हा सेमीफायनलला सपशेल गांगरले; फुटक्या नशीबाचा खेळ
1999 चा इतिहास पुसून टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम तुटून पडेल, अशी चर्चा होती. मात्र, कोलकाताच्या इडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली.
कोलकाता : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात विश्वचषक 2023 च्या उपांत्य फेरीच्या लढतीला सुरुवात झाली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
दक्षिण आफ्रिकेची अवसानघातकी फलंदाजी
साखळी सामन्यात वाघासारखी कामगिरी करून मोठ्या लढतीत कागदी वाघ होण्याची परंपरा आजही दक्षिण आफ्रिकन फलंदाजीची राहिली. 1999 चा इतिहास पुसून टाकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेची टीम तुटून पडेल, अशी चर्चा होती. मात्र, कोलकाताच्या इडन गार्डनवर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीसमोर सपशेल नांगी टाकली. कॅप्टनसी सोडून दुसंर काहीच करू न शकलेला बवुमा स्वस्तात बाद झाल्यानंतर डाॅट बाॅलच्या प्रेशरमध्ये डिकाॅकही बाद झाला. त्यानंतर वॅन देर दसेन आणि एडन मारक्रमही बाद झाला. त्यामुळे 12व्या षटकात 4 बाद 44 अशी स्थिती झाली. आफ्रिकेच्या इनिंगचा पहिला चौकार आठव्या षटकात आला.
पावसाने खेळ थांबला
दक्षिण आफ्रिकेची स्थिती अत्यंत नाजूक झाल्यानंतर पाऊसही त्यांच्या पाचवीला पुजलेला आला असल्याने खेळ थांबला आहे. मात्र, टीम इंडियाशी फायनलला दोन हात करण्याकडे ऑस्ट्रेलियाने एक पाऊल टाकलं आहे. क्लासेन आणि मिलर किती धावसंख्या उभारून देतात, यावर आफ्रिकेचं भविष्य असेल. तत्पूर्वी, नाणेफेक जिंकल्यानंतर बावुमा म्हणाला, 'आम्ही प्रथम फलंदाजी करू. उपांत्य फेरीच्या सामन्यात आम्ही ऑस्ट्रेलियासारख्या संघाचा सामना करत आहोत, हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. आम्हाला फक्त आमच्या गेम प्लॅनवर चिकटून राहावे लागेल. आमच्या संघात न्गिडीच्या जागी शम्सी आणि फेहलुकवायोच्या जागी यान्सेन आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स म्हणाला की, 'आम्हालाही येथे प्रथम फलंदाजी करायला आवडले असते, पण सध्या गोलंदाजीसाठी हवामान आहे. तुम्हाला सुरुवातीला चांगला स्विंग मिळू शकतो. आज स्टॉइनिस आणि अॅबॉट यांच्याऐवजी मॅक्सवेल आणि स्टार्क आमच्या संघात खेळत आहेत.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग-11
डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग 11
क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), रॅसी व्हॅन डर डुसेन, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, मार्को यान्सिन, केशव महाराज, कागिसो रबाडा, जेराल्ड कोएत्झी, तबरेझ शम्सी.
ईडन गार्डन्स स्थिती कशी आहे?
ईडन गार्डन्सवर आतापर्यंत 35 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. यामध्ये 13 वेळा धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने विजय मिळवला आहे. त्याचबरोबर 20 वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला यश मिळाले आहे. दोन सामनेही अनिर्णित राहिले आहेत. येथे 11 डावात 300+ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, असे 14 वेळा घडले आहे की संघ 200 चा आकडा देखील स्पर्श करू शकले नाहीत.
इतर महत्वाच्या बातम्या