FIFA World Cup 2022: सर्वाधिक वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलंन केला संघ जाहीर, डेनियल एल्व्सला संधी, तर फर्मिनो, कोटिन्होला विश्रांती
FIFA Brazil Squad: आतापर्यंत पाच वेळा फिफा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या ब्राझीलने नुकताच आगामी फिफा वर्ल्ड कप 2022 साठी आपला 26 सदस्यांचा संघ जाहीर केला आहे.
Team Brazil for Fifa World Cup 2022 : कतारमध्ये 20 नोव्हेंबर पासून फिफा वर्ल्ड कप 2022 (FIFA WC 2022) स्पर्धेला सुरुवात होत आहे. आता प्रत्येक देश आपआपला संघ जाहीर करताना दिसत आहे. दरम्यान सर्वाधिक म्हणजेच पाच वेळा विश्वचषक विजेत्या ब्राझीलनेही आपला संघ घोषित केला आहे. सोमवारी ब्राझीलने आपल्या 26 सदस्यीय संघाची घोषणा केली. यामध्ये 39 वर्षीय डेनियल एल्व्सला संधी दिली आहे. तर फर्मिनो, कोटिन्होसारखे स्टार खेळाडू नसल्याचंही दिसून आलं आहे.
अॅस्टन व्हिलाचा स्टार स्ट्रायकर फिलिप कोटिन्हो दुखापतीमुळे संघात नसून दुसरीकडे, विंची, गॅब्रिएल, पेड्रो या युवा वेगवान फॉरवर्ड खेळाडूंना स्थान दिल्याने लिव्हरपूलचा स्टार फॉरवर्ड फर्मिनोला संघाबाहेर ठेवण्यात आलं आहे. ब्राझीलच्या 26 जणांच्या संघात 12 खेळाडू इंग्लिश प्रीमियर लीग खेळणार आहेत. दरम्यान ब्राझील 24 नोव्हेंबर रोजी विश्वचषकातील पहिला सामना सर्बियाविरुद्ध खेळेल त्यानंतर स्वित्झर्लंड आणि कॅमेरुनबरोबरही त्यांचे सामने असतील.
कसा आहे ब्राझीलचा संघ?
गोलकिपर: एलिसन (लिव्हरपूल), एडरसन (मँचेस्टर सिटी), वेव्हर्टन (पाल्मेरियास)
डिफेन्डर : ब्रेमर (जुव्हेंटस), अॅलेक्स सँड्रो (जुव्हेंटस), एडर मिलिटो (रिअल माद्रिद), मार्किनोस (पीएसजी), थियागो सिल्वा (चेल्सी), डॅनिलो (जुव्हेंटस), डॅनियल अल्वेस (पुमास), अॅलेक्स टेलेस (सेव्हिला)
मिडफिल्डर: ब्रुनो गुइमेरेझ (न्यूकॅसल युनायटेड), कासेमिरो (मँचेस्टर युनायटेड), फ्रेड (मँचेस्टर युनायटेड), एव्हर्टन रिबेरो (फ्लेमेंगो), फॅबिन्हो (लिव्हरपूल), लुकास पॅक्वेटा (वेस्टहॅम)
फॉरवर्ड्स: अँटोनी (मँचेस्टर युनायटेड), गॅब्रिएल जीसस (आर्सनल), गॅब्रिएल मार्टिनेली (आर्सनल), नेमार ज्यू. (पीएसजी), पेड्रो (फ्लेमेन्गो), राफिन्हा (बार्सिलोना), रिकारलिसन (टोटेनहॅम), रॉड्रिगो (रिआल माद्रिद), विंची ज्युनियर (रिआल माद्रिद)
Fifa वर्ल्ड कपचं वेळापत्रक कसं?
ग्रुप स्टेजचे सामने 20 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर दरम्यान खेळवले जातील. पहिल्या दिवशी एक आणि त्यानंतर दररोज दोन ते चार सामने होतील. 3 ते 6 डिसेंबर दरम्यान राऊंड ऑफ-16 चे सामने होणार आहेत. त्यानंतर 9 आणि 10 डिसेंबरला उपांत्यपूर्व फेरी, 13 आणि 14 डिसेंबरला उपांत्य फेरी, 17 डिसेंबरला तिसऱ्या क्रमांकाची लढत आणि 18 डिसेंबरला अंतिम फेरी होईल. या सर्व सामन्यांसाठी 5 वेगवेगळ्या वेळा निश्चित करण्यात आल्या आहेत. सामने भारतीय वेळेनुसार रात्री 8.30, 9.30, 12.30, दुपारी 3.30 आणि सायंकाळी 6.30 वाजता सुरू होतील.
कुठे होणार सामने?
हे सर्व सामने कतारच्या वेगवेगळ्या आठ स्टेडियममध्ये खेळवले जातील. संपूर्ण विश्वचषकात 64 सामने होणार आहेत. अंतिम-4 मध्ये पोहोचणारे संघ 7-7 सामने खेळतील.
लाइव्ह टेलिकास्ट आणि स्ट्रीमिंग कुठे बघू शकता?
Viacom-18 कडे भारतातील FIFA विश्वचषक 2022 चे प्रसारण हक्क आहेत. ज्यामुळे स्पोर्ट्स-18 आणि स्पोर्ट्स-18 एचडी चॅनेलवर सामन्यांचं थेट प्रक्षेपण केलं जाईल. तसंच VOOT Select आणि Jio TV वर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रीमिंग पाहता येईल.