एक्स्प्लोर
बर्मिंगहॅम कसोटीत इंग्लंडच्या नावे जमा होणार ‘हा’ अनोखा विक्रम
15 मार्च 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिली कसोटी खेळवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 141 वर्षांत इंग्लंडनं 999 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला आहे.

बर्मिंगहॅम (इंग्लंड) : भारत आणि इंग्लंड संघांदरम्यान येत्या एक ऑगस्टपासून कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. या मालिकेतला पहिला सामना बर्मिंगहॅममध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या दृष्टीनं खास ठरणार आहे. कारण कसोटी क्रिकेटमधला इंग्लंडचा हा एक हजारावा सामना असेल. इंग्लंडचा संघ पहिल्या कसोटीसाठी बर्मिंगहॅममधल्या एजबेस्टनच्या मैदानावर जेव्हा उतरेल तेव्हा एक हजार कसोटी सामने खेळणारा क्रिकेटच्या इतिहासातला पहिला संघ ठरणार आहे. इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखालील इंग्लिश संघाला ही ऐतिहासिक कसोटी खेळण्याचा मान मिळणार आहे. क्रिकेटच्या आजवरच्या इतिहासात एकूण 2313 कसोटी सामने खेळवण्यात आले आहेत. 15 मार्च 1877 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पहिली कसोटी खेळवण्यात आली होती. त्यानंतर गेल्या 141 वर्षांत इंग्लंडनं 999 कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम गाजवला आहे. या 999 पैकी 357 सामन्यात इंग्लंडला विजय मिळवता आला आहे. 297 सामन्यांत प्रतिस्पर्धी संघानं इंग्लंडला धूळ चारली. तर 345 सामने हे अनिर्णित राहिले आहेत. सर्वाधिक कसोटी खेळणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाचा दुसरा क्रमांक लागतो. ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात 812 कसोटी सामने खेळले आहेत. इंग्लंड-ऑस्ट्रेलियानंतर या यादीत वेस्ट इंडिज आणि भारताचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात कोणत्या संघानं किती सामने खेळले आहेत? 1) इंग्लंड – 999 कसोटी ( पहिली कसोटी, 15 मार्च 1877 ) 2) ऑस्ट्रेलिया – 812 कसोटी ( पहिली कसोटी, 15 मार्च 1877 ) 3) वेस्ट इंडिज – 535 (पहिली कसोटी, 23 जून 1928, वि. इंग्लंड) 4) भारत – 522 ( पहिली कसोटी, 25 जून 1932, वि. इंग्लंड़) 5) दक्षिण आफ्रिका – 427 (पहिली कसोटी, 12 मार्च 1889, वि. इंग्लंड) 6) न्यूझीलंड – 426 (पहिली कसोटी, 10 जाने. 1930, वि. इंग्लंड) 7) पाकिस्तान – 415 (पहिली कसोटी, 16 ऑक्टो. 1952, वि. भारत) 8) श्रीलंका – 274 (पहिली कसोटी, 17 फेब्रु. 1982, वि. इंग्लंड) 9) बांगलादेश – 108 ( पहिली कसोटी, 10 नोव्हें. 2000, वि. भारत) 10) झिम्बाब्वे – 105 (पहिली कसोटी, 18 ऑक्टो. 1992, वि. भारत) 11) आयर्लंड – 1 (पहिली कसोटी, 11 मे 2018, वि. पाकिस्तान) 12) अफगाणिस्तान – 1 (पहिली कसोटी, 14 जून 2018, वि. भारत)
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
बुलढाणा
नाशिक
मुंबई






















