क्रिकेट विश्वावर शोककळा! सिकंदर रजाच्या 13 वर्षीय भावाचा दुर्दैवी मृत्यू, बोर्डाकडून शोक व्यक्त
Zimbabwe Sikandar Raza News : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सिकंदर रजा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Sikandar Raza 13-Year-Old Brother Passes Away : झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा टी-20 कर्णधार सिकंदर रजा यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रजा यांचा धाकटा भाऊ मोहम्मद महदीचे वयाच्या अवघ्या 13 व्या वर्षी निधन झाले आहे. या दुर्दैवी घटनेमुळे केवळ झिम्बाब्वे क्रिकेटच नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने (ZC) अधिकृत निवेदन जारी करत या दुःखद बातमीला दुजोरा दिला आहे.
बोर्डाने सांगितले की, मोहम्मद महदीचे 29 डिसेंबर 2025 रोजी हरारे येथे निधन झाले. तो जन्मापासूनच ‘हिमोफिलिया’ या गंभीर आजाराने ग्रस्त होता. अलीकडे प्रकृती अधिक बिघडल्याने त्याची प्राणज्योत मालवली. 30 डिसेंबर रोजी हरारेतील वॉरेन हिल्स स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने व्यक्त केला शोक
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “झिम्बाब्वे क्रिकेट, आपल्या टी-20 कर्णधार सिकंदर रजा आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मनापासून शोक व्यक्त करत आहे. या कठीण काळात बोर्ड, खेळाडू आणि संपूर्ण स्टाफ रजा कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. ईश्वराने कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची ताकद द्यावी आणि मोहम्मद महदीच्या आत्म्यास शांती लाभो, हीच प्रार्थना.”
सोशल मीडियावर व्यक्त झाला रजाचा आक्रोश
या दुःखद घटनेनंतर सिकंदर रजानीही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भावना व्यक्त केली. त्यानी झिम्बाब्वे क्रिकेट बोर्डाचे निवेदन शेअर करत तुटलेल्या हृदयाचा इमोजी पोस्ट केला, जो त्यांच्या वेदना स्पष्टपणे दर्शवत होता. क्रिकेट चाहते तसेच सहकारी खेळाडू रजाना सातत्याने धीर देत आहेत.
कारकिर्दीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर वैयक्तिक आघात
ही वैयक्तिक शोकांतिका अशा वेळी घडली आहे, जेव्हा सिकंदर रजा आपल्या कारकिर्दीच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आहेत. नुकत्याच झालेल्या ILT20 2025 स्पर्धेत त्याने शारजाह वॉरियर्स संघासाठी शानदार कामगिरी केली होती. 10 सामन्यांत 171 धावा आणि 10 विकेट्स घेत रजाने आपली अष्टपैलू क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली होती.
टी-20 वर्ल्ड कप 2026 कडे लक्ष
आगामी काळात सिकंदर रजावर मोठी जबाबदारी आहे. फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व करणार आहेत. संघाचा कणा असलेल्या रजांसाठी हा काळ भावनिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरणार आहे.
हे ही वाचा -




















