(Source: ECI | ABP NEWS)
EDच्या रडारवर टीम इंडियाचे दिग्गज क्रिकेटपटू, सट्टेबाजीच्या 'गेम'मध्ये फसले युवराज-हरभजन सिंग?
टीम इंडियाला ऐतिहासिक वर्ल्ड कप जिंकवणारे तिघे दिग्गज युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना सध्या एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

Yuvraj Singh Harbhajan Singh ED News : टीम इंडियाला ऐतिहासिक वर्ल्ड कप जिंकवणारे तिघे दिग्गज युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना सध्या एका मोठ्या अडचणीत सापडले आहेत. एकेकाळी करोडो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या या तीन माजी क्रिकेटपटूंवर आता अवैध ऑनलाइन सट्टेबाजी अॅपच्या जाहिराती करण्यात सहभाग असल्याचा गंभीर आरोप झाला आहे.
त्यामुळे ED ने युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैना यांना चौकशीसाठी बोलावलं आहे. यासोबत बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिलाही बोलावलं आहे. या चौघांवर ऑनलाइन बेटिंग अॅप्ससाठी जाहिरात केल्याचा आरोप आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 1XBET सारख्या बेकायदेशीर अॅप्सची जाहिरात केल्या प्रकरणात या चौघांची चौकशी करण्यात आली आहे.
युवराज, हरभजन आणि रैनाची चौकशी का झाली?
वृत्तानुसार, 1XBET सारख्या बंदी घालण्यात आलेल्या सट्टेबाजी प्लॅटफॉर्मच्या जाहिरातीत सहभागी झाल्याप्रकरणी युवराज सिंग, (Yuvraj Singh) हरभजन सिंग (Harbhajan Singh) आणि सुरेश रैनासह (Suresh Raina) इतर काही सेलिब्रिटींना EDने चौकशीसाठी बोलावले.
सूत्रांच्या माहितीनुसार, हे प्लॅटफॉर्म 1XBET सारखी प्रतिनिधी म्हणून इतर नावांचा वापर करत होते, ज्यात वेब लिंक्स आणि QR कोड होते. जे युजर्सना बेकायदेशीर बेटिंग प्लॅटफॉर्मवर रिडायरेक्ट करतात आणि जे कायद्यांचे उल्लंघन आहे
ED ने सांगितले की, या प्लॅटफॉर्मने स्किल बेस्ड गेम असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात त्यांनी अशा एल्गोरिदमचा वापर केला होता, जो आधीच फिक्स्ड (रिग्ड) होता. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार हे जुगार म्हणून गणले जाते.
याच 1XBET प्लॅटफॉर्मची जाहिरात युवराज सिंग, हरभजन सिंग आणि सुरेश रैनासारख्या दिग्गज खेळाडूंनी केल्याचे समोर आल्यावर तपास यंत्रणांनी त्यांची चौकशी केली.
उर्वशी रौतेला, सोनू सूद यांचाही समावेश
मिळालेल्या अहवालांनुसार, जेव्हा युवराज सिंग आणि सुरेश रैनाशी संबंधित लोकांशी यासंदर्भात प्रतिक्रिया मागण्यात आली, तेव्हा त्यांनी या आरोपांचा स्पष्टपणे इन्कार केला. मात्र, केवळ हे तीन क्रिकेटपटूच नव्हे, तर बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध कलाकारही या प्लॅटफॉर्मशी संबंधित असल्याचे समोर आले आहे.
या यादीत अभिनेते सोनू सूद आणि अभिनेत्री उर्वशी रौतेलाचाही समावेश आहे. इतकेच नव्हे तर काही इतर कंपन्या आणि संस्थाही ईडीच्या तपासाच्या चौकटीत आल्या आहेत. अहवालांनुसार, 1XBET या कंपनीने आपल्या जाहिरातींसाठी तब्बल 50 कोटींहून अधिक रक्कम खर्च केल्याची माहितीही समोर आली आहे.





















