Year Ender 2022: यंदाच्या वर्षात टी-20 क्रिकेटमध्ये सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमारची चमकदार कामगिरी
हे वर्ष संपण्यापूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची नावे समोर आली आहेत.
Year Ender 2022: उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. हे वर्ष संपण्यापूर्वी भारतासाठी आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणारा फलंदाज आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांची नावे समोर आली आहेत. भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं (Suryakumar Yadav) टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. तर, भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) विकेट घेण्यात आघाडीवर आहे.
सूर्यकुमारच्या फलंदाजीसमोर भल्याभल्या गोलंदाजांचं लोटांगण
भारताचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवनं 2022 मध्ये 31 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांमध्ये 1 हजार 164 धावा केल्या आहेत. यादरम्यान सूर्यकुमार यादवची सरासरी 46.56 आहे. तर त्याचा स्ट्राईक रेट 187.43 इतका आहे. याशिवाय सूर्यकुमार यादवनं यावर्षी 2 शतकांसह 9 वेळा 50 किंवा त्यापेक्षा धावा केल्या आहेत. एका वर्षात टी-20 फॉरमॅटमध्ये 1000 धावा करणारा सूर्या भारताचा पहिला आणि जगातील दुसरा फलंदाज ठरला.
भुवनेश्वर कुमारची भेदक गोलंदाजी
भारताचा गोलंदाज भुवनेश्वर कुमारनं यावर्षी टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अप्रतिम गोलंदाजी केली. त्यानं या वर्षात 32 सामने खेळले आहेत. ज्यात त्यानं 19.56च्या सरासरीनं 37 विकेट घेतल्या आहेत. भुवनेश्वर त्याच्या गोलंदाजीत कमी धावा देण्यासाठी ओळखला जातो. 2022च्या गोलंदाजीतही असेच दिसून आलं. त्यानं 2022 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात फक्त 6.98 च्या इकॉनॉमीसह गोलंदाजी केली. त्याचवेळी चार धावांत पाच विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे.
भारताची 2022 मधील कामगिरी
भारतानं या वर्षात एकूण सात कसोटी सामने खेळले, ज्यामध्ये 4 सामने जिंकले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतानं 24 पैकी 14 सामने जिंकले. त्याचबरोबर टी-20 मधील 40 पैकी 28 सामने भारतानं जिंकले आहेत.
यंदाच्या वर्षात टी-20 क्रिकेटमधील सर्वाधिक धावा:
क्रमांक | फलंदाज | इनिंग | धावा |
1 | सूर्यकुमार यादव | 31 | 1 हजार 164 |
2 | मोहम्मद रिझवान | 25 | 996 |
3 | विराट कोहली | 20 | 781 |
4 | सिकंदर राजा | 23 | 735 |
5 | बाबर आझम | 26 | 735 |
हे देखील वाचा-