क्रिकेटसाठी घर सोडले, पाणीपुरी विकली.... आज भारतीय संघात पदार्पण, यशस्वीचा खडतर प्रवास
Yashasvi Jaiswal Success Story : मुंबईत यशस्वीला राहण्यासाठी घरही नव्हते.. तो आझाद मैदानावर झोपलाय... कधी पाणीपुरी विकली.. आज तो ज्या शिखरावर पोहचलाय
Yashasvi Jaiswal Success Story : युवा यशस्वी जायस्वाल याचे भारतीय संघात पदार्पण झालेय. वेस्ट इंडिजविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात यशस्वी जायस्वाल याला पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. यशस्वी जायस्वाल रोहित शर्मासोबत सलामीला उतरणार आहे. पण यशस्वी जायस्वाल याचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास सोपा नाही. यशस्वीला हे यश मिळवण्यासाठी संघर्षाची पराकाष्ठा करावी लागली. क्रिकेटच्या वेडापायी लहानपणी यशस्वीने घर सोडले होते. मुंबईत यशस्वीला राहण्यासाठी घरही नव्हते.. तो आझाद मैदानावर झोपलाय... कधी पाणीपुरी विकली.. आज तो ज्या शिखरावर पोहचलाय त्या यशामध्ये त्याचा मोठा संघर्ष आहे. यशस्वी जायस्वाल याचा संघर्ष अनेक युवा खेळाडूंसाठी प्रेरणादायी आहे. पाहूयात यशस्वीची संघर्षगाथा.....
यशस्वी जयस्वाल हा मूळचा उत्तर प्रदेशच्या भदोही खेड्यातील एका छोट्याशा दुकानदाराचा मुलगा आहे. क्रिकेटच्या वेडापायी त्यानं वयाच्या अवघ्या 11व्या वर्षी मुंबई गाठली. त्यानंतर अनेक दिव्य पार करत आज तो यशाच्या एका अत्युच्य शिखरावर जाऊन पोहोचला आहे. त्यावेळी स्वप्ननगरी मुंबईत यशस्वीच्या मुक्कामाचीही अडचण होती. मग त्यानं मुंबईतलं आझाद मैदान हेच आपलं घर बनवलं. खरं तर मोकळं आकाश हेच त्याच्या घराचं छत होतं. पण हळूहळू ओळखी वाढवून तो आझाद मैदानावरच्या मुस्लीम युनायटेडच्या तंबूत झोपू लागला. त्या काळात यशस्वीनं पोटापाण्यासाठी आझाद मैदानावर पाणीपुरीही विकली. क्रिकेट खेळायला मिळावं या एकमेव हेतूनं त्यानं कुठलंही काम हलकं मानलं नाही. पाणीपुरी विकतानाचे त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. अंडर 19 विश्वचषकात यशस्वी जायस्वाल याने आपल्या दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत जगभरातील क्रीडाप्रेमींचं लक्ष वेधले होते.
यशस्वी जायस्वालच्या संघर्षात प्रशिक्षक ज्वाला सिंह यांची मिळालेली साथ मोलाची आहे. त्यांनी यशस्वीमधील गुणवत्तेला न्याय मिळवून दिलाच पण त्याच्या डोक्यावर छप्पर येईल असा हक्काचा आसराही मिळवून दिला. ज्वाला सिंह यांनी दिलेल्या पाठिंब्यानं यशस्वीचा आत्मविश्वास बळावला. मग त्यानं मुंबईत वयोगटाचं क्रिकेट गाजवायला सुरुवात केली. मुंबईतल्या आंतरशालेय क्रिकेटमध्ये यशस्वीनं आधी रिझवी हायस्कूलचं नाव मोठं केलं. मग मुंबई क्रिकेटच्या वयोगट क्रिकेटची एकेक पायरी त्यानं झपाझप पार केली. त्यानंतर टीम इंडियाच्या अंडर 19 संघातही स्थान पटकावले. मुंबईकडून रणजी सामन्यातही तो खेळलाय. अंडर 19 विश्वचषकात पाकिस्तानविरोधात झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने शतकी खेळी केली होती. यशस्वी याला त्यानंतर राजस्थान संघाने आपल्या ताफ्यात घेतले. त्यासाठी तीन कोटींपेक्षा जास्त रक्कम मोजली होती. जिद्द, चिकाटी, मेहनत आणि संयम याच्या जोरावर आज यशस्वी एक एक शिखर सर करतोय. भविष्यात तो भारतीय संघाचा महत्वाचा सदस्य होईल, यात काही शंकाच नाही.
आतापर्यंतचे यशस्वी जायस्वालचे करिअर -
यशस्वाली जायस्वाल याने 2019 मध्ये फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पदार्पण केले, आतापर्यंत झालेल्या 15 सामन्यातील 26 डावात त्याने 80.21 च्या सरासरीने 1845 धावा केल्या आहेत. यामध्ये 9 शतके आणि 2 अर्धशतकाचा समावेश आहे. त्याशिवाय 32 लिस्ट ए क्रिकेटमध्ये 54 च्या सरासरीने 1511 धावांचा पाऊस पाडलाय, त्यामध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके झळकावली. 57 टी 20 सामन्यात 30 च्या सरासरीने आणि 144 च्या स्ट्राईक रेटने त्याने 1578 धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने एक शतक आणि नऊ अर्धशतके ठोकली आहे.
आयपीएलमध्येही यशस्वी जायस्वाल याने खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. 2020 मध्ये राजस्थानने यशस्वी जायस्वाल याला 2.4 कोटी रुपयात खरेदी केले होते. आतापर्यंत 37 सामन्यात त्याने 33 च्या सरासरीने आणि 149 च्या स्ट्राईक रेटने 1172 धावा काढल्या आहेत.
यशस्वी जायस्वाल याने विजय हाजरे ट्रॉफी आणि ईरानी चषकात द्विशतक झळकावले आहे. 2019 च्या विजय हजारे चषकात त्याने 203 धावांची खेळी केली होती. 2022-23 मध्ये मध्य प्रदेश आणि रेस्ट ऑफ इंडिया यांच्यात झालेल्या ईरानी चषकातील सामन्यात 213 धावांची खेळी केली होती.