IND vs PAK Preview: महामुकाबल्यात भारताचे पारडे जड, पाहा सामन्याआधी दोन्ही संघाचे विश्लेषण
World Cup, IND vs PAK Preview: 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाची सुरुवात झाल्याचे सर्वजण म्हणतात, पण खऱ्या विश्वचषकाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्याने झाली.
World Cup, IND vs PAK Preview : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याची सर्वांनाच प्रतिक्षा असते. 5 ऑक्टोबर रोजी विश्वचषकाची (World Cup 2023) सुरुवात झाल्याचे सर्वजण म्हणतात, पण खऱ्या विश्वचषकाची सुरुवात 8 ऑक्टोबर रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील सामन्याने झाली. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यातील सर्वात मोठ्या लक्षनीय सामन्याची आता प्रतिक्षा आहे. भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) या दोन संघातीली खेळाडू मैदानाबाहेर चांगले मित्र आहेत. खेळीमेळीचे वातावरण असते. पण लक्ष्मणरेषा ओलांडली की सर्वांचे हावभाव आणि देहबोली बदलते. या सामन्यात शानदार कामगिरी करा अन् हिरो व्हा, हे दोन्ही संघातील खेळाडूंना माहितेय.. क्रिकेट रसिंकाच्या मनात स्थान मिळवण्याची संधी असल्यामुळे दोन्ही संघातील खेलाडू जिवाचे रान करत असतात.
भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) हे दोन्ही संघ कागदावर तुल्यबळ आहेत. पण भारतीय संघावर दडपण कमी असल्यामुळे पारडे जड आहे. आशिया चषकात भारताकडून पराभूत झाल्यामुळे आणि सुरुवातीच्या सामन्यात हवी तशी कामगिरी न केल्यामुळे पाकिस्तान संघावर त्यांच्या माध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी टीका केली आहे. त्यामुळे पाकिस्तान संघावर दडपणाचे मोठे ओझे आहे. त्यातच पाकिस्तान संघाच्या फलंदाजीचा कणा मानल्या जाणाऱ्या बाबर आझम याला पहिल्या दोन्ही सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. त्यामुळे त्याच्यावरही दबाव आहे. श्रीलंकेविरोधात पाकिस्तानची फलंदाजी कोलमडली होती, पण अब्दुलाह शफीक आणि मोहम्मद रिझवान यांनी शतकी खेळी करत अशक्यप्राय विजय मिळवून दिला.
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात जबरदस्त विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला आणि दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तानचा सहज पराभव केला. कांगारुविरोधात भारतीय संघाने शानदार कामगिरी केली तर अफगाणिस्तानविरोधात गोलंदाज आणि फलंदाजांनी टॉप कामगिरी केली आहे. याचाच अर्थ असा आहे, शनिवारी होणाऱ्या महामुकाबल्यात भारतीय संघाचे पारडे जड आहे.
शुभमन गिल याच्या खेळण्यावर अद्याप प्रश्नचिन्ह आहे. पण त्याने अहमदाबाद येथे आल्यानंतर सराव केला आहे. शुभमन गिल शनिवारी मैदानात उतरण्यास तयार झाला तर टीम इंडियाची ताकद आणखी वाढणार आहे. कारण, सध्याच्या घडीला शुभमन गिल भारताचा सर्वात टॉप फलंदाज आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा, केएल राहुल भन्नाट फॉर्मात आहेत. विराट कोहलीने दोन्ही सामन्यात अर्धशतके ठोकली आहेत. दुसऱ्या सामन्यात रोहित शर्माने वादळी शतक ठोकले होते. ऑस्ट्रेलियाविरोधात राहुलने नाबाद 97 धावांची खेळी केली होती. भारतीय संघाची फलंदाजी समतोल आणि मजबूत दिसत आहे.
गोलंदाजीचा विचार केल्यास मोहम्मद सिराजला अहमदाबादमध्ये आराम दिला जाऊ शकतो. दोन्ही सामन्यात सिराज महागडा ठरला होता. त्यामुळे शनिवारी मोहम्मद शामी खेळताना दिसू शकतो. शामीला अहमदाबादमध्ये खेळण्याचा तगडा अनुभव आहे. बुमराहही लयीत आहे. कुलदीप यादव आणि रविंद्र जाडेजा भन्नाट फॉर्मात आहे. आर. अश्विनलाही संधी मिळाल्यास तो सोनं करु शकतो. अहमदाबादचे मैदानात दिल्लीसारखे छोटे नाही, त्यामुळे अश्विनला खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाकिस्तान संघाचे बलाबल कितीही चांगले असले तरीही भारतीय संघाचे पारडे जड आहे.
वनडे विश्वचषकात भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जाडेजा, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शामी, रविचंद्रन अश्विन, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव.
वनडे विश्वचषकात पाकिस्तान संघ -
बाबर आजम (कर्णधार), शादाब खान, फखर जमान, इमाम-उल-हक, अब्दुल्ला शफीक, मोहम्मद रिजवान, सऊद शकील, इफ्तिखार अहमद, सलमान अली आगा, मोहम्मद नवाज, उसामा मीर, हारिस रऊफ, हसन अली, शाहीन अफरीदी आणि मोहम्मद वसीम.
आणखी वाचा :
"3 फलंदाज, 2 गोलंदाज... पाकिस्तानचे पाच खेळाडू भारताची डोकेदुखी वाढवणार? "