(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दोन वेळा विश्वविजेतेपद, एकदा ऑस्ट्रेलियाकडून स्वप्न भंगलं, तिसऱ्यांदा टीम इंडिया चषक उंचावणार?
Team India World Cup 2023 : वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली.
Team India World Cup 2023 : वानखेडेवर न्यूझीलंडचा पराभव करत टीम इंडियाने चौथ्यांदा वनडे विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली. यंदाच्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने न्यूझीलंडचा पराभव केला. भारताने आतापर्यंत दोन वेळा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. चाहत्यांना तिसऱ्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. वानखेडेवर भारताने न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव केला. यामध्ये विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने शतके झळकावली. मोहम्मद शमीने 7 विकेट घेतल्या. भारतायी संघ तिसऱ्या विश्वचषक उंचवणार का? याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
विश्वचषकातील भारताचा प्रवास -
भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने शानदार कामगिरी करत इतिहास रचला होता. त्यानंतर 2003 मध्ये भारतीय संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाने भारताचा 125 धावांनी पराभव केला होता. त्यानंतर टीम इंडियाने 2011 च्या फायनलमध्ये पोहोचून जेतेपद पटकावले. आता भारत पुन्हा चौथ्यांदा फायनलमध्ये पोहोचला आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये भारतीय संघ फायनलमध्ये खेळणार आहे.
1983 मध्ये पहिल्या जेतेपदावर कोरले नाव -
भारताने 1983 मध्ये पहिल्यांदा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारताने प्रथम फलंदाजी करताना फक्त 183 धावा केल्या होत्या. त्यावेळी के श्रीकांतने 57 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. त्याने 7 चौकार आणि 1 षटकार मारला होता. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 140 धावांत ऑलआऊट झाला. भारताकडून मोहिंदर अमरनाथ आणि मदन लाल यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. बलविंदर संधूने 2 आणि कपिल देवने 1 विकेट घेतली होती.
2003 मध्ये स्वप्न भंगलं -
2003 च्या विश्वचषक फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 359 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाला 234 धावांपर्यंत मजल मारता आली. फायनलमध्ये भारताला 125 धावांनी पराभव झाला अन् कोट्यवधी चाहत्यांचे स्वप्न भंगलं. फायनलमध्येरिकी पाँटिंगने 140 धावांची शानदार खेळी केली.भारताकडून वीरेंद्र सेहवागने 82 धावांची एकाकी झुंज दिली होती.
लंकादहन करत दुसऱ्यांदा चषक उंचावला -
2011 मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वात भारताने दुसऱ्यांदा चषकावर नाव कोरले. टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव करत इतिहास रचला होता. वानखेडेवर प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 6 गडी गमावून 274 धावा केल्या. प्रत्युत्तरदाखल भारताने चार विकेट्स गमावून विजय मिळवला होता. भारताकडून गौतम गंभीरने 97 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. महेंद्रसिंग धोनीने नाबाद 91 धावा केल्या होत्या. झहीर खान आणि युवराज सिंगने यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या होत्या. तर हरभजन सिंहला एक विकेट मिळाली होती.