WMPL 2024 : स्मृती मंधाना खेळणार पुण्याकडून, नाशिक, सोलापूर संघात कोण कोण?
WMPL 2024 Final Teams : एमसीएच्या महिला प्रिमियर लीगसाठी संघांच्या मालकीसाठी विक्रमी किंमत खर्च करण्यात आली. पुणे संघासाठी ४एस गटाची सर्वाधिक बोली लागली. तर वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडकडे नाशिक संघाची मालकी आली आहे.
WMPL 2024 Final Teams : पुणे : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या महिला प्रिमियर लीगसाठी चार संघांची मालकी घेण्यासाठी झालेल्या लिलाव प्रक्रियेत विक्रमी रुपयांची बोली लागली. चार संघांसाठी संघ मालकांनी तब्बल15.9 कोटी रुपये खर्च केले. सर्व राज्य संघटनांमध्ये महिला संघाच्या मालकीसाठी मिळालेला हा विक्रमी महसूल ठरला. महिलांसाठी स्वतंत्र ट्वेन्टी-20 लीग आयोजित करणारी महाराष्ट्र क्रिकेट संघटना ही एकमेव राज्य संघटना असून, लीगला 24 जूनपासून सुरुवात होणार आहे. स्पर्धेत एकूण 13 सामने खेळले जातील. भारतीय संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना पुणे संघाकडून खेळणार आहे. ती पुण्याची कर्णधार असेल. तर अनुजा पाटील ही नाशिकमधून खेळताना दिसणार आहे.
स्मृती मंधाना पुण्याच्या ताफ्यात -
एमपीएलमधील पुणेरी बाप्पा संघाचे मालक असलेल्या सुहाना सह्याद्री सुजनिल्स 4 एस समूहाने महिला प्रिमियर लीगमध्ये देखिल पुणे संघासाठी सर्वाधिक 5.1 कोटी रुपयाची बोली लावली. महिला संघ देखिल पुणेरी बाप्पा संघाने ओळखला जाईल. फ्रँचाईजीने भारताची उपकर्णधार स्मृती मानधनाची आपल्या संघाची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली.
नाशिक, सोलापूर संघात कोण कोण ?
वाई एंटरप्रायझेस प्रायव्हेट लिमिटेडने नाशिक संघासाठी 3.8 कोटी रुपयाची दुसरी सर्वोत्तम बोली लावली. त्यांनी भारताची आंतरराष्ट्रीय खेळाडू अनुजा पाटीलची आयकॉन खेळाडू म्हणून निवड केली. सोलापूर रॉयल्सची मालकी असलेल्या कपिल सन्स समूहाने या वेळी रत्नागिरी संघासाठी 3.6 कोटी रुपयांची बोली लावली. कंपनीने पुढे आपल्या शहर आणि जिल्ह्यातील बदलाचा निर्णय घेत रायगड सोबत जाण्याचा निर्णय घेतला. या संघाचे नाव रायगड रॉयल्स असे असेल. या संघाने आक्रमक फलंदाज आंतरराष्ट्रीय खेळाडू किरण नवगिरे आपली आयकॉन खेळाडू म्हणून निवडले. रॉयल जिनियस स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने 3.4 कोटी रुपयांत सोलापूर संघाची मालकी घेतली. त्यांनी देविका वैद्यला आयकॉन खेळाडू म्हणून निवडले.
🚨 Great News 🚨
— Female Cricket (@imfemalecricket) April 28, 2024
4-team tournament, WMPL featuring icon players like Smriti Mandhana, Anuja Patil, Kiran Navgire, and Devika Vaidya will start in June 2024.
A step in the right direction by Maharashtra Cricket Association 👏 #CricketTwitter pic.twitter.com/LifoOGIPaV
रोहित पवार काय म्हणाले ?
एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार या कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. पण, त्यांचा संदेश सचिव कलमेश पिसाळ यानी वाचून दाखवला. मला अभिमान आहे की एमसीए या नात्याने आम्हाला फ्रँचाईजी आधारीत महिला टी-20 लीगचे आयोजन करणारी पहिली संघटना म्हणून संधी मिळाली. गेल्या वर्षी एमपीएल खेळाडूंच्या लिलावात आम्ही महिला प्रिमियर लीगचे आयोजन करण्याचे वचन दिले होते. आम्ही आमचा शब्द पाळला आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.
एमपीएलने आमच्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले. मला खात्री आहे की महिला प्रिमियर लीग देखील आमच्या महिला क्रिकेटपटूंसाठी असेच व्यासपीठ बनले. मला विश्वास आहे की महिला प्रिमियर लीगमधून भविष्यातील भारतीय खेळाडू उदयास येतील, असेही पवार यांनी नमूद केले.
दरम्यान, एमपीएल आणि महिला प्रिमियर लीगचे अध्यक्ष सचिन मुळ्ये यांनी लिलावाचा तपशील आणि प्रक्रिया सर्व बोलीदारांपुढे सादर केली. लिलावापूर्वी एमसीएसच्या सर्वोच्च परिषदेचे सदस्य विनायक द्रविड, राजू काणे, रणजित खिरीड, सुशील शेवाळे, सुनील मुथा यांनी संघ मालकांचा सत्कार केला. कल्पना तापीकर यांनी आभार मानले आणि महिला प्रिमियर लीग महाराष्ट्रातील महिला क्रिकेटसाठी बदलाचे पाऊल ठरेल असे मत व्यक्त केले.