IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारताची विश्वविक्रमाला गवसणी!
IND vs WI: त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन पार्क ओव्हल स्टेडियमवर (Queen's Park Oval) काल खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 3 धावांनी विजय मिळवलाय.
IND vs WI: त्रिनिदादच्या (Trinidad) क्वीन पार्क ओव्हल स्टेडियमवर (Queen's Park Oval) काल खेळण्यात आलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं 3 धावांनी विजय मिळवलाय. या विजयासह भारतानं तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीय. वेस्ट इंडीडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकून भारतानं विश्वविक्रमाला गवसणी घातलीय. एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवणारा भारत पहिला संघ ठरलाय.
भारताची विक्रमाला गवसणी
भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात पहिला एकदिवसीय सामना क्वीन्स पार्क ओव्हलच्या पोर्ट ऑफ स्पेन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यापूर्वी भारतानं या मैदानावर 11 सामने खेळून 9 सामने जिंकले होते. मात्र, काल खेळण्यात आलेल्या एकदिवसीय सामन्यात भारतानं वेस्ट इंडीजला धुळ चाखली. या विजयासह भारत एकाच मैदानावर सर्वाधिक विजय मिळवणारा पहिला संघ ठरलाय. भारतानं या मैदानावर आतापर्यंत 10 सामने जिंकले आहेत.
शिखन धवनची दमदार कामगिरी
रोहित शर्माच्या अनुपस्थितीत वेस्ट इंडीजविरुद्ध एकदिवसीय मालिकेत शिखर धवन भारतीय संघाचं नेतृत्व करत आहेत. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शिखर धवनचं थोडक्यात शतक हुकलं. दरम्यान, शिखर धवन 97 धावांवर खेळत असताना गुडाकेश मोटीनं त्याला झेलबाद केलं. या सामन्यात दमदार कामगिरी करणाऱ्या शिखर धवनला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं.
रोमहर्षक सामन्यात भारताचा 3 धावांनी विजय
या सामन्यात वेस्ट इंडीजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर प्रथम फलंदाजी करत भारतानं 50 षटकात 7 विकेट्स गमावून 308 धावा केल्या. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोटी यांना प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. तर, रोमॅरियो शेफर्ड आणि अकेल होसेन यांना एक-एक विकेट्स मिळाली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या वेस्ट इंडीजच्या संघानं भारताला कडवी झुंज दिली. परंतु, त्यांना तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. वेस्ट इंडीजच्या संघानं 50 षटकात 6 विकेट्स गमावून 305 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि युजवेंद्र चहलनं प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.
हे देखील वाचा-
- IND vs WI, 1st ODI Result : भारताचा वेस्ट इंडीजवर 3 धावांनी विजयी, वाचा 10 महत्त्वाचे मुद्दे एका क्लिकवर
- IND vs WI, 1st ODI Result : रोमहर्षक सामन्यात भारत 3 धावांनी विजयी, वेस्ट इंडीजची झुंज व्यर्थ
- Team India : शिखर धवन कर्णधार होताच टीम इंडियाचा नकोसा विक्रम, श्रीलंकेच्या 5 वर्षे जुन्या रेकॉर्डची बरोबरी